उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू झालेली पोस्टरबाजी संपण्याचे नाव घेत नाहिये. राहुल गांधी यांच्या सिंघम अवतारातील पोस्टरला उत्तर देण्यासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चाने भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांची पोस्टर्स लावली आहेत. पोस्टरमध्ये योगी आदित्यनाथांच्या छायाचित्रासोबत वाघाचे छायाचित्र दर्शविण्यात आले आहे, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अन्य पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या छायाचित्रासोबत गाढवाचे छायाचित्र दर्शविण्यात आले आहे.
जागोजागी लावलेल्या या पोस्टर्सवर ‘संकल्प २०१७’ आणि ‘अबकी बार योगी सरकार’ अशा ओळी लिहिल्या आहेत. पोस्टरवर डाव्या हाताला वरच्या कोपऱ्यात भाजप उत्तर प्रदेशचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांचे छायाचित्र आहे. तर खालच्या बाजूस बसपाच्या सुप्रिमो मायावतीचे गाढवासोबत छायाचित्र दर्शविण्यात आले असून, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत ताज कॉरिडोर प्रकरणाचा उल्लेख असलेले वाक्य लिहिण्यात आले आहे. ‘मुल्ला भ्रष्टाचारी अखिलेश यादव’ असा उल्लेख असलेले मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे गाढवासमवेतचे छायाचित्रदेखील या पोस्टरवर झळकत आहे. याच पोस्टरवर राहुल गांधी यांना देशाचे तुकडे करणारे, तर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा मुसलमानांची दिशाभूल करणारे असे संबोधले आहे.
उत्तर प्रदेशात भ्रष्टाचार आणि गुंडगिरी वाढली आहे. महंत योगी आदित्यनाथ हा भाजपचा असा चेहरा आहे, जो उत्तर प्रदेशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सक्षम आहे. या कारणासाठीच महंत योगी आदित्यनाथ यांना २०१७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार घोषित करण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रादेशिक कार्यसमितीचे पूर्व सदस्य इरफान अहमद यांनी सांगितले.
१७ एप्रिल रोजी अलाहाबादमधील एका पोस्टरवर उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्ष केशव प्रसाद मौर्या यांना महाभारतातील अर्जुनाच्या अवतारात सादर करण्यात आले होते. त्यांना अर्जुनाप्रमाणे एका योद्ध्यासारखे रथात उभे असलेले दर्शविण्यात आले होते. या आधी १६ एप्रिलला जेव्हा केशव प्रसाद मौर्या वाराणसीमध्ये दाखल झाले होते, तेव्हा यांना भगवान कृष्णाच्या रुपात दर्शविण्यात आले होते.

Story img Loader