Yogi Adityanath : सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. प्रयागराज या ठिकाणी सुरु असलेला कुंभ मेळा हा विशिष्ट जात किंव धर्मासाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे. माणुसकी हा आपला धर्म आहे. पूजा करण्याचा, देवाला वंदन करण्याचा प्रकार वेगवेगळा असेल मात्र धर्म एकच आहे आणि तो सनातन धर्म आहे. कुंभमेळा त्याच सनातन धर्माचं प्रतीक आहे असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
कुंभमेळ्यात सहा कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमान कुंभमेळा काळात स्नान करणं पवित्र मानलं जातं. कुंभ मेळ्याने एकतेचा संदेशच दिला आहे. यामध्ये कुठलाही भेदाभेद नाही. जे लोक सनातन धर्मावर टीका करतात त्या सगळ्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की इथे येऊन पाहा. एवढंच नाही तर २६ जानेवारीच्या दिवशी प्रयागराज या ठिकाणी सुमारे तीन कोटी लोक पवित्र स्नान करण्यासाठी पोहचले आहेत असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. आज योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) हे एनडीटीव्हीच्या विशेष कार्यक्रमात उपस्थित त्यावेळी त्यांनी सनानत धर्म हा राष्ट्रधर्म असल्याचं म्हटलं आहे.
कुंभमेळ्याचे दिवस येणाऱ्या पिढ्यांसाठी अविस्मरणीय असतील-योगी आदित्यनाथ
१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी हे ४५ दिवस महाकुंभ मेळ्याचे आहेत. येणाऱ्या पिढ्यांसाठी हे अविस्मरणीय दिवस असतील याबाबत माझ्या मनात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कुंभमेळ्याचं आयोजन कसं करायचं याबाबत एक दृष्टीकोन दिला होता. त्यामुळे आम्ही त्याच अनुषंगाने यासाठी काम करत आहोत. कुंभमेळ्याने एकतेचा संदेश संपूर्ण देशात दिला आहे. ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याठिकाणी सर्वांगिण विकासाचा पाया आपोआप रचला जातो असंही योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath ) यांनी म्हटलं आहे.
सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे-योगी आदित्यनाथ
“मी आधीही हे म्हटलं आहे आणि आताही सांगतो आहे की सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. सनातन धर्म हा मानवतेचा धर्म आहे. कुंभमेळा या सनातनत धर्माचं महापर्व आहे याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.” पुढे योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही २०१९ पासून कुंभमेळ्याची तयारी करत होतो. कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या करणं, आयोजन करणं यासह बरीच कामं होती जी आम्ही पूर्णत्वास आणली आहेत. प्रयागराज या ठिकाणचे रस्ते, रेल्वेमार्ग, हवाई मार्ग यासाठी आम्ही मेहनत घेतली. प्रभू रामचंद्र हे रावणाचा वध केल्यानंतर महर्षी भारद्वाज यांचं दर्शन घेण्यासाठी प्रयागराज या ठिकाणी आले होते. या ठिकाणी कुंभमेळा भरणार म्हटल्यावर आम्ही या प्रयागराजचा विकासही त्याच पद्धतीने केला असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.