Yogi Adityanath on Muslims in Uttar Pradesh : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की त्यांच्या राज्यात सर्व धर्माचे लोक सुरक्षित आहेत. आदित्यनाथ म्हणाले, “मी एक योगी असून राज्यातील प्रत्येकाच्या सुखाची कामना करतो. आमच्या राज्यात हिंदू सुरक्षित असेल तर मुसलमान देखील सुरक्षित आहे. अनेक हिंदू कुटुंब राहत असलेल्या भागात एखादं मुस्लीम कुटुंब वास्तव्यास असेल तर ते कुटुंब स्वतःला सुरक्षित समजतं. मात्र, १०० मुस्लीम कुटुंब असलेल्या भागात ५० हिंदूंची घरं असतील तर ते सुरक्षित असतात का?”

योगी आदित्यनाथ म्हणाले, “एखाद्या परिसरात हिंदूंची १०० घरं असतील तर तिथे राहणारं एक मुस्लीम कुटुंब स्वतःला सुरक्षित समजतं. तिथे त्यांना त्यांची धार्मिक कामं करण्याचं स्वातंत्र्य असतं. परंतु, १०० मुस्लीम कुटुंब वास्तव्यास असलेल्या परिसरात ५० हिंदू सुरक्षित असतात का? नाही. बांगलादेश हे त्याचं उदाहरण आहे. पूर्वी पाकिस्तान त्याचं उदाहण होता. परंतु, तिथे काय झालं ते सर्वांना माहिती आहे. पाकिस्तानात काय झालं? अफगाणिस्तानात काय झालं? याची आपल्याला कल्पना आहे. जर कुठे धूर दिसत असेल तर आपण सावध झालं पाहिजे. कोणाला इजा झाली असेल तर इतरांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आम्ही राज्यकर्ते म्हणून राज्यातील प्रत्येकाशी सारखाच व्यवहार करतो.

मुसलमान उत्तर प्रदेशमध्ये सर्वात सुरक्षित : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले, “आमच्या राज्यात सर्वच जण सुरक्षित आहेत. मुसलमान सर्वात सुरक्षित आहेत. या राज्यात आमची (भाजपाची) सत्ता आल्यापासून जातीय दंगली होणं बंद झालं आहे. आमच्या राज्यात हिंदू सुरक्षित आहेत तर मुसलमान देखील तितकेच सुरक्षित आहेत. २०१७ च्या आधी उत्तर प्रदेशात दंगली झाल्या होत्या. हिंदूंची दुकानं जाळली जात होती. त्याचवेळी काही मुसलमानांची दुकानं देखील पेटवण्यात आली. हिंदूंची घरं पेटली, दुसरीकडे मुसलमानांची घरं देखील पेटली. मात्र आता सगळे सुरक्षित आहेत. मी उत्तर प्रदेशचा नागरिक आहे आणि मी एक योगी देखील आहे. मी राज्यातील सर्वांच्या आनंदाची कामना करतो. मी सर्वांना एकत्र आणून सर्वांचा विकास करण्याचा विचार करत असतो.

सनातन हा विश्वातील सर्वात प्राचीन धर्म आहे असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी दावा केला की आजवर कुठल्याही हिंदू शासकाने आपल्या शक्तीचा वापर करून, बळाचा वापर करून कुठेही हिंसा केली नाही, कुठलाही प्रदेश ओरबाडला नाही.