मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घोषणेनंतर राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. मनसेनं भोंगे हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलनही केलं. याच दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवले गेल्याची माहिती समोर येत होती. आता स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात तब्बल एक लाख भोंगे उतरवले गेले असल्याचं सांगितलंय. राज्यात आतापर्यंत एक लाख भोंगे उतरवले गेले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत कुणी करू नये, असा इशारा योगींनी दिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी दावा केला की राज्यात आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाऊडस्पीकर धार्मिक स्थळांवरून उतरवले गेले आहेत. तसेच काढून टाकलेले लाऊडस्पीकर पुन्हा लावले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. काढलेले भोंगे पुन्हा लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

शनिवारी सायंकाळी झाशीत मुख्यमंत्री योगी यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा केली, विकासकामांचा विभागीय आढावा घेतला आणि राज्यात आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाऊडस्पीकर हटवल्याचा दावा केला. शिवाय काढून टाकलेले लाऊडस्पीकर पुन्हा चालू होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. “धार्मिक कार्यक्रम धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असावेत, रस्त्यावर कोणताही उत्सव आयोजित करू नये आणि या कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जावी,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याची आणि इतर लाऊडस्पीकरचा आवाज विहित मर्यादेपर्यंत मर्यादित करण्याची मोहीम २५ एप्रिलपासून सुरू झाली होती आणि ती १ मेपर्यंत चालली होती. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी लखनऊ येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, सर्व धार्मिक स्थळांवरून बेकायदेशीरपणे लावलेले लाऊडस्पीकर कोणताही भेदभाव न करता काढले जात आहेत आणि असे सर्व लाऊडस्पीकर बेकायदेशीर श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. परवानगी नसलेलेच लाऊडस्पीकर काढण्यात येत असून लाऊडस्पीकरबाबतच्या कारवाईदरम्यान उच्च न्यायालयाचे आदेशही लक्षात ठेवले जात असल्याचेही कुमार म्हणाले होते.