गेल्या काही महिन्यांपासून वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरू आहे. काशी विश्वनाथ मंदिर पाडून तिथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे. अलीकडेच वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाने मशिदीत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात मशिदीत सर्वेक्षणाला सुरुवातही झाली. दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मशिदीत त्रिशूळ काय करतंय? असा प्रश्न आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले, त्या इमारतीला मशीद म्हणाल तर मग वाद होईल. ईश्वराने ज्याला दृष्टी दिलीय त्यांनी पाहावं आणि सांगावं मशिदीत त्रिशूळ काय करतंय? आम्ही तर ठेवलेलं नाही. तिथे ज्योतिर्लिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. तिथल्या भिंती ओरडून ओरडून काय सांगतायत? मला वाटतं मुस्लिमांच्या बाजूने प्रस्ताव यायला हवा, त्यांनी म्हटलं पाहिजे की, एक ऐतिहासिक चूक झाली आहे आणि आम्हाला त्या चुकीवर उपाय हवा आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते. या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी ज्ञानवापीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा आज मध्यरात्रीपासून, नेमकं काय होणार? वाचा

याचप्रकरणी अजून एका प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आपला देश संविधानावर चालतो, कुठलंही मत किंवा धर्माच्या आधारावर चालत नाही. एक लक्षात घ्या, मी ईश्वराचा भक्त आहे, पण कुठल्याही ढोंगीपणावर विश्वास ठेवत नाही आणि इतरांनीही ठेवू नये. तुमचं मत, तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत मर्यादित असू द्या. धर्म हा मशिदीपर्यंत अथवा प्रार्थनास्थळापर्यंत असेल. या गोष्टी रस्त्यावर आणू नका. तुमच्या या गोष्टी तुम्ही इतरांवर लादू शकत नाही. या देशात कोणाला राहायचं असेल तर त्याच्यासाठी राष्ट्र प्रथम असलं पाहिजे. तुमचं मत किंवा तुमचा धर्म यापेक्षा राष्ट्र सर्वात पुढे असायला हवं.