उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. १० फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून योगी आदित्यनाथच भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना आव्हान देण्यासाठी आता समाजवादी पक्षानं मोठी खेळी खेळली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर शहर मतदारसंघातून समाजवादी पक्षानं भाजपाच्याच माजी नेत्याच्या पत्नी सभावती शुक्ला यांना उमेदवारी देऊन योगींना आव्हान उभं केलं आहे.
समाजवादी पक्षाची खेळी
समाजवादी पक्षानं भाजपाचे दिवंगत नेते उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या पत्नी सभावती शुक्ला यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिली आहे. उपेंद्र दत्त शुक्ला यांनी अभाविपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ४० वर्ष भाजपासाठी काम केलेले शुक्ला हे महत्त्वाचे ब्राह्मण नेते होते. तसेच, त्यांनी भाजपाचे उत्तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील काम केलं होतं. ते गोरखपूरचे देखील भाजपा अध्यक्ष राहिले होते.
शुक्ला कुटुंबीयांची नाराजी सपाच्या पथ्यावर?
२०१८मध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदासाठी गोरखपूर खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शुक्ला यांनी गोरखपूर लोकसभा पोटनिवडणूक लढवली होती. मात्र, सपा-बसपाच्या आघाडीसमोर त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, शुक्ला यांच्या निधनानंतर भाजपाचं त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये निर्माण झाली आहे. समाजवादी पक्षानं याच गणितावर शुक्ला यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.
“भाजपानं माझ्या वडिलांचा अपमान केला. त्यांनी भाजपाच्या केलेल्या सेवेचा पक्षाला विसर पडला आहे. योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा गोरखपूरला भेट दिली आहे. पण त्यांनी एकदाही आमच्या कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया शुक्ला यांचा मुलगा अमित शुक्ला यानं व्यक्त केली आहे.
भाजपासाठी दुहेरी आव्हान
दरम्यान, एकीकडे शुक्ला कुटुंबीयांची नाराजी सपाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झालेली असताना दुसरीकडे गोरखपूरमधील विद्यमान आमदार राधा मोहनदास अगरवाल यांच्या नाराजीचा देखील फटका योगी आदित्यनाथ यांना बसण्याची शक्यता आहे. योगींना गोरखपूरमधून उमेदवारी दिल्यानंतर विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं गेल्याची भावना स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.