उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं तेथील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमध्ये बोलताना एमआयएम आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळावर देखील त्यांनी तोंडसुख घेतलं आहे.

“ओवैसी समाजवादी पक्षाचे एजंट!”

योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना असदुद्दीन ओवैसी यांना समाजवादी पक्षाचे एजंट म्हणत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. “मी आज या चचाजान आणि अब्बाजानच्या अनुयायांना निक्षून सांगतो, की त्यांनी लक्षपूर्वक हे ऐकून घ्यावं. जर उत्तर प्रदेशमध्ये लोकांच्या भावना भडकवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलात, तर अशा वेळी सक्तीने गोष्टी कशा हाताळायच्या, ते उत्तर प्रदेशमधील सरकारला चांगलंच ठाऊक आहे”, असं आदित्यनाथ म्हणाले. सीएएच्या मुद्द्यावरून असदुद्दीन औवैसी लोकांच्या भावना भडकवत असून ते सपाचे एजंट असल्याचं आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

“बुलडोझर चालवणारं सरकार”

योगी आदित्यनाथ यांनी यावेळी आपल्या सरकारचं कौतुक केलं. “उत्तर प्रदेशमध्ये आता दंगली होत नाही. दंगलमुक्त उत्तर प्रदेश अशी राज्याची ओळख आहे. राज्यात आता दंगली आणि माफियांचं सरकार नसून माफियांवर बुलडोझर चालवणारं सरकार आहे”, असं ते म्हणाले.

“२०१७पूर्वी दर तिसऱ्या दिवशी दंगल व्हायची”

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील दंगलींवरून योगी आदित्यनाथ यांनी आधीच्या सरकारवर टीका केली. “२०१७पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये दर तिसऱ्या-चौथ्या दिवशी दंगल व्हायची. पण आज सीएएच्या नावावर लोकांच्या भावना भडकवणाऱ्यांना मी इशारा देतो”, असं ते म्हणाले.

Story img Loader