सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर थेट योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केलीय. शेतकऱ्यांसमोर भाषण देताना प्रणिती शिंदेंनी योगी आणि महाराज राजकारणात आल्यावर देशाचं वाटोळं होतं, असं म्हणत टीका केलीय.
“उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ आल्यानंतर शेतकरी कायदे रद्द केले. एक वर्ष तुम्ही वाट पाहिली. ७०० शेतकऱ्यांचे तुम्ही बळी घेतले आणि मग कायदे मागे घेतले. लाज वाटायला पाहिजे,” असा टोला प्रणिती शिंदेंनी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकावर टीका करताना लगावलाय. त्याचप्रमाणे पुढे बोलताना प्रणिती यांनी योगी आणि महाराजांची जागा मठांमध्ये आणि मदिरांमध्ये आहे असं म्हणत टोला लगावला आहे. “योगी, महाराज यांच्याबद्दल आहे आम्हाला मान पण त्यांचं स्थान आहे मंदिरामध्ये आणि मठात राजकारणात नाही. ज्या दिवशी देशाच्या राजकारणात योगी आणि महाराज येतात त्या दिवशी देशाचं वाटोळं सुरु होतं,” असं त्या भाषणात म्हणाल्या. त्यांचे हे शब्द ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला.
काम पाहून मतदान केलं पाहिजे असंही प्रणिती यांनी म्हटलंय. “जे काम करतात त्यांना मतदान करणं महत्वाचं आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर कामाला महत्व द्या,” असं आवाहन त्यांनी उपस्थितांना भाषणादरम्यान केलं.
उत्तर प्रदेशात भाजपाला एकहाती सत्ता…
उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांना योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास सज्ज झालेत. भाजपाने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आणि पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांच्या आधारे उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि सपानं भाजपाविरोधात रान उठवलं होतं. मात्र, त्याचा परिणाम मतदारांवर झाला नसल्याचंच कालच्या निकालांवरून समोर आलं आहे.
एकूण जागा – ४०३
भाजपा – २५५
सपा – १११
बसपा – १
काँग्रेस – २
राष्ट्रीय लोकदल – ८
इतर – २६