देशभरात सध्या टोमॅटोचे दर चर्चेचा विषय ठरले आहेत. सर्वसामान्यांपासून अगदी सेलिब्रेटींपर्यंत सगळेच या वाढलेल्या टोमॅटो दरावर बोलत आहेत. या वाढत्या दरांमुळे एकीकडे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टोमॅटो आहेत त्यांना फायदा होत आहे, मात्र मध्यमवर्गीयांचं महिन्याच्या आर्थिक गणितावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शहरी नागरिकांकडून या दरवाढीवरून सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या मंत्री आणि भाजपा नेत्या प्रतिभा शुक्ला यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.
प्रतिभा शुक्ला म्हणाल्या, “पहिली गोष्ट म्हणजे टोमॅटो कुंडीत लावा. सर्व वस्तू महाग आहेत, तर खाणं सोडून द्या. त्या वस्तू आपोआप स्वस्त होतील.”
“पोषण बागेत टोमॅटोचंही उत्पादन घेतलं जाऊ शकतं”
मंत्री शुक्ला पुढे असंही म्हणाल्या, “आमच्याकडे एका गावात एक पोषण बाग बनवली आहे. त्या गावातील सर्व महिला गावातील एका भागात कचरा एकत्र करतात. तेथे या महिलांनी भाजीपाला उत्पादन केलं आहे. त्यामुळे आता त्यांना भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जावं लागत नाही. त्या पोषण बागेत टोमॅटोचंही उत्पादन घेतलं जाऊ शकतं.”
हेही वाचा : विश्लेषण: टोमॅटोची अतिरेकी दरवाढ कशामुळे?
“महागाई नवी नाही. दरवर्षी या काळात टोमॅटो महाग होतात”
“प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. महागाई नवी नाही. दरवर्षी या काळात टोमॅटो महाग होतात,” असं म्हणत त्यांनी टोमॅटो दरवाढीवरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं.