Mamata Banerjee Slams Yogi Adityanath: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराच्या विरोधात भाजपाकडून टीकास्र सोडले जात आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत हिंसाचारासाठी त्यांना जबाबदार धरले होते. यावर आता ममता बॅनर्जी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची आठवण करून देताना यात ३० लोकांचा बळी गेल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले.
मुस्लीम धर्मगुरूंच्या बैठकीत बोलत असताना ममता बॅनर्जी यांनी योगींना सर्वात मोठा भोगी असल्याचे म्हटले. तसेच त्यांच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या बनावट चकमकींचा दाखला दिला. “योगी मोठ्या मोठ्या बाता करतात. पण ते सर्वात मोठे भोगी आहेत. महाकुंभमेळ्यात अनेक लोकांचे जीव गेले. उत्तर प्रदेशमध्ये बनावट चकमकीत अनेकांना प्राण गमवावे लागले”, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले.
तसेच योगींच्या राज्यात लोकांना मोर्चेही काढता येत नाहीत. उत्तर प्रदेशच्या तुलनेत बंगालमध्ये खूप स्वातंत्र्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगाल जळत आहे, असे विधान योगी आदित्यनाथ यांनी काल (दि. १३ एप्रिल) केले होते. हरदोई जिल्ह्यातील राजा नरपती सिंह यांच्या स्मृतीस्थळी आयोजित कार्यक्रमात बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री दंगेखोरांना शांतीदूत म्हणत आहेत. परंतु, या दंगेखोरांना प्रेमाची भाषा कळत नाही. यांना केवळ काठीचीच भाषा समजते. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तिथल्या सरकारने दंगेखोरांना सूट दिली आहे. त्यामुळे संपूर्ण मुर्शिदाबाद एक आठवड्यापासून जळत आहे आणि सरकारने मौन बळगले आहे. या अराजकतेवर लगाम लावायला हवा.”
मुर्शिदाबाद येथील दंगल पूर्वनियोजित
भाजपाच्या आरोपांना उत्तर देत असताना मुर्शिदाबाद येथील दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. “विरोधकांनी केलेल्या आरोपांनुसार जर तृणमूल काँग्रेस पक्ष हिंसाचारात सहभागी असता तर आमच्याच नेत्यांच्या घरावर हल्ले झाले नसते. आमच्या पक्षाने वक्फ कायद्याविरोधात संसदेत कडक भूमिका घेतली. वक्फ कायद्याच्या विरोधातील लढाईत टीएमसी पक्ष आघाडीवर आहे”, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
तसेच भाजपाच्या पाठिंब्याने काही वृत्तसमूह बनावट व्हिडीओ व्हायरल करत असून पश्चिम बंगालची बदनामी करत आहेत, असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. “आम्ही खोट्या व्हिडीओंची खातरजमा केली आहे. आठ व्हिडीओपैकी काही व्हिडीओ कर्नाटक, काही उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील आहेत. हे सर्व बंगालला कलंकित करण्यासाठी केले जात असून याबद्दल त्यांना लाज वाटली पाहिजे.