तेलंगणामधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. ३० नोव्हेंबर रोजी येथे मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तसंच, विरोधक -सत्ताधारीही आमने सामने आले आहेत. येथे भाजपा, काँग्रेस आणि बीआरएस अशी तिहेरी लढत आहे. तर, एआयएमआयएमनेही उमेदवार उभे केले आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बीआरएस आणि एआयएमआयएम वर सडकून टीका केली होती. त्यावर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ नोव्हेंबर रोजी तेलंगणातील जाहीर सभांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) आणि AIMIM वर जोरदार टीका केली होती. हे दोन्ही पक्ष केंद्र सरकारला सहकार्य करत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं होतं. “मोदीजी के है दो यार, ओवेसी और केसीआर (पीएम मोदींचे दोन मित्र आहेत – ओवेसी आणि केसीआर)”, असं राहुल गांधी म्हणाले होते. “केसीआर यांना मोदींनी पंतप्रधान व्हावे आणि मोदींना केसीआर मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे” असं राहुल गांधी पुढे म्हणाले होते.

राहुल गांधींच्या या टीकेवर असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधी, बोलण्यापूर्वी विचार करा. तुम्ही पन्नाशी ओलांडली आहात. एकटेपणामुळे तुम्ही त्रासला असाल. हा तुमचा निर्णय आहे. आम्हाला कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. आम्ही कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी आम्हाला छेडले तर आम्ही शांत बसत नाही”, अशा इशारा असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधींना दिला.

तेलंगणातील बीआरएस आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार हटवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. काँग्रेस हा जुना पक्ष असून आगामी तेलंगणा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होईल, असाही विश्वास राहुल गांधींनी व्यक्ते केला होता.

तेलंगणा ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह ३ डिसेंबरला निकाल जाहीर होतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You are 50 lonely asaduddin owaisi on rahul gandhi yaar dig sgk
Show comments