कॅनबेरा : ‘तुम्ही आमचे राजे नाहीत, तुम्ही आम्हाला लुटले, आमच्या लोकांचा नरसंहार केला,’ अशा तिखट शब्दांत ऑस्ट्रेलियाच्या सीनेटर लिडिया थॉर्प यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत आलेल्या ब्रिटनचे राजे चार्ल्स-३ यांना थेट सुनावले. ब्रिटनचे राजे चार्ल्स ३ आणि त्यांच्या पत्नी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतसोहळ्याचे आयोजन संसदेमध्ये सोमवारी करण्यात आले होते. थॉर्प यांच्या घोषणाबाजीनंतर त्यांना स्वागत सोहळ्यातून बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा >>> Women Kills Husband : धक्कादायक! पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास धरला अन् उपवास सोडताच पतीची केली हत्या; नेमकं काय घडलं?

एक सक्रिय आंदोलक आणि तीव्र विरोध करणाऱ्या म्हणून थॉर्प यांची ओळख आहे. राजे चार्ल्स यांच्यासमोर घोषणाबाजी करताना थॉर्प म्हणाल्या, ‘आमच्या लोकांचा तुम्ही नरसंहार केला. आमचे तुम्ही जे काही चोरले आहे-आमची हाडे, आमच्या कवट्या, आमची मुले, आमचे लोक ते आम्हाला परत द्या. तुम्ही आमची भूमी उद्ध्वस्त केली. आमच्याबरोबर करार करा. आम्हाला करार हवा आहे. ही तुमची भूमी नाही. तुम्ही आमचे राजे नाहीत.’

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी ब्रिटनचे राजे चार्ल्स-३ यांचे स्वागत केले. ‘तुम्ही ऑस्ट्रेलियाप्रति खूप आदर दाखविला आहे. ज्यावेळी ऑस्ट्रेलियाची घटनात्मक रचना कशी असेल आणि ब्रिटनशी आमचे संबंध कसे असतील, यावर वादविवाद होत होते, तेव्हाही हा आदर कायम होता. मात्र, स्थिती कायमच सारखी नसते.’