ओडिशाील तिहेरी रेल्वे अपघातप्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे असून अमेरिकेतील (स्थलांतरित) भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांनी नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस सत्तेत असताना झालेल्या एका रेल्वे अपघातवरूनही केंद्राला टार्गेट केल.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार वास्तवाला स्वीकारत नाही”, असं राहुल गांधी म्हणाले. “केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना असाच एक रेल्वे अपघात घडला होता. इंग्रजांच्या चुकीमुळे ट्रेनला अपघात झाला असे काँग्रेसने तेव्हा म्हटले नव्हते. तर, आम्ही आमची जबाबदारी स्वीकारून तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. परंतु, भाजपा सरकार हे स्वीकरत नाही. ते सबबी काढतात आणि वास्तव स्वीकारत नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले. “एवढंच नव्हे तर भाजपाला दोषारोप करणे आणि चुका न स्वीकारण्याची”ही सवय असल्यांचं राहुल गांधी म्हणाले.
“तुम्ही त्यांना (भाजपा) काहीही विचारा. ते मागे वळून पाहतील आणि उत्तरे देतील. तुम्ही त्यांना विचारा की ओडिशातील रेल्वे अपघात कसा झाला? ते काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी काय केलं याबद्दल बोलतील”, असं राहुल गांधी म्हणाले.
ओडिशातील बहनगा बाजार स्थानकावर शुक्रवारी (३ जून) सायंकाळी भीषण अपघात घडला. बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस,कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांना धडकल्याने तब्बल २७५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला तर हजारो प्रवासी जखमी झाले आहेत. यावरून काँग्रेसने केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचा राजीनामा मागितला आहे.
“२७० हून अधिक मृत्यूनंतरही मोदी सरकारने जबाबदारी स्वीकारली नाही. एवढ्या वेदनादायी अपघाताची जबाबदारी घेण्यापासून मोदी सरकार पळून जाऊ शकत नाही. पंतप्रधानांनी तत्काळ याचा शोध घ्यावा, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, असंही राहुल गांधी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं.