रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे प्रमुख आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर टीकास्र सोडलं आहे. जंतरमंतरवरून तुम्हाला न्याय मिळणार नाही, असे बृजभूषण सिंह यांनी रविवारी म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे सात पीडित महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक एफआयआर अल्पवयीन महिला कुस्तीपटूने दिलेल्या तक्रारीनुसार, पॉक्सो (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना बृजभूषण सिंह म्हणाले, “हरियाणातील ९० टक्के खेळाडू आणि पालकांचा भारतीय कुस्ती महासंघावर विश्वास आहे. ज्या कुटुंबांनी आणि मुलींनी आरोप केले आहेत, ते सर्व एकाच आखाड्याशी संबंधित आहेत. त्या आखाड्याचे प्रमुख काँग्रेस खासदार दीपेंदर हुडा आहेत.”

दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना उद्देशून बृजभूषण सिंह म्हणाले, “तुम्हाला जंतरमंतरवर आंदोलन करून न्याय मिळणार नाही. तुम्हाला न्याय हवा असेल, तर पोलीस ठाणे किंवा न्यायालयात जावं लागेल. ते (आंदोलनकर्ते कुस्तीपटू) आजपर्यंत पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात कधीही गेले नाहीत. न्यायालय जो निर्णय देईल, तो मला मान्य असेल.”

एक दिवस आधी बृजभूषण सिंह यांनी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं म्हटलं होतं. यावेळी ते म्हणाले, “मी पूर्णपणे निर्दोष आहे. सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी कोणत्याही प्रकारच्या तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदाचा राजीनामा देणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही, परंतु मी गुन्हेगार म्हणून राजीनामा देणार नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You cant get justice from jantarmantar wfi chief brij bhushan sharan singh statement rmm
Show comments