हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी शुक्रवारी भाजपच्या नेत्यांवर केला. अप्रत्यक्षपणे ही हत्याच असल्याचेही त्यांनी राज्यसभेत म्हटले आहे.
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि जेएनयू विद्यापीठातील देशविरोधी घोषणाचा प्रकार या दोन्ही मुद्द्यांवरून राज्यसभेत दोन दिवस चर्चा झाली. जेएनयूतील विद्यार्थ्यांनी दुर्गामातेबाबत काढलेल्या वादग्रस्त पत्रकाच्या वर्णनावरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावरही सीताराम येचुरी यांनी टीका केली.
स्मृती इराणी यांनी यासंदर्भात माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरिअन यांनी कोणत्याही समुदायाविरोधात काहीही न बोलण्याची या सभागृहाची परंपरा असल्याचे सांगत वादग्रस्त टिप्पणी तपासण्यात येईल आणि त्यामध्ये काही आक्षेपार्ह असल्यास ते कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे स्पष्ट केले.
स्मृती इराणी यांनी आपण दुर्गामातेचे भक्त असून, मी जे काही बोलले त्याचे पुरावे माझ्याकडे असल्याचे सांगितले. हे पुरावे विद्यापीठाकडूनच मला मिळालेले असून, मला पुरावे मागण्यात आल्यामुळे मी त्याचा उल्लेख केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी स्मृती इराणी यांच्या भाषणातील त्या उल्लेखावर तीव्र आक्षेप घेऊन या प्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली.

Story img Loader