भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि पंतप्रधानांची खिल्ली उडवतो. मात्र त्यांनी कितीही टीका केली तरी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यामागे काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे, असे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. गुन्हय़ांमध्ये दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींबाबत केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकुमावर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तीन दिवसांपूर्वी टीकास्त्र सोडले होते. त्यावरून विरोधकांच्या टीकेसही धार चढली होती. या पाश्र्वभूमीवर सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली.
राहुल यांचे विधान सरकारवर म्हणजेच पर्यायाने पंतप्रधानांवरही टीका करणारे होते. त्यामुळे राहुल यांच्या मातोश्री आणि काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा या प्रकरणी कोणाची बाजू घेतात याकडे सर्वाचे लक्ष होते. त्यावर प्रथमच मौन सोडताना, सोनियांनी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले. आम्हाला भाजपची भीती वाटत नाही, कोणत्याच विरोधी पक्षाला आम्ही घाबरत नाही. आमची प्रगतीच्या दिशेने पडणारी दमदार पावले वेगाने अशीच पुढे सरकत राहतील, असा विश्वास सोनियांनी या वेळी व्यक्त केला. येथील एका मोठय़ा सभेत बोलताना सोनिया यांनी पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या मोदींवर शरसंधान केले. आजवरच्या इतिहासात इतकी विधेयके संमत करणारे एकही सरकार नाही. आमच्यावर टीका करणारे सत्तेत असताना असे का करू शकले नाहीत, असा सवालही सोनियांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा