Prashant Kishor on Bihar Students Protest : बिहार लोकसेवा आयोगाचा पेपर फुटल्याप्ररकणी विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्याभरापासून बिहारमध्ये आंदोलन पुकारले. या आंदोलनाला काल रात्री गंभीर स्वरुप प्राप्त झालं. पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावर पाण्याचा फवाराही मारला. यावेळी प्रशांत किशोर गैरहजर होते, असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जातोय. या दाव्यावर प्रशांत किशोर यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
तुम्ही आमच्याकडून ब्लँकेट घ्या आणि आम्हालाच रुबाब दाखवा, असं प्रशांत किशोर म्हणताच परिस्थिती अधिक चिघळली. काल (२९ डिसेंबर) सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. काही आंदोलकांनी गांधी मैदानातून जेपी गोलंबरच्या दिशेने कूच करत बॅरिकेड्सवरून उड्या मारल्या. पोलिसांच्या या कारवाईदरम्यान, प्रशांत किशोर गैरहजर होते, असं काहींनी म्हटलंय. त्यामुळे आंदोलनस्थळी प्रशांत किशोर येताच, प्रशांत किशोर परत जा अशा घोषणा होऊ लागल्या. यामुळे विद्यार्थ्यांनी नेत्यांशी वाद झाला. यावर तुम्ही आमच्याकडून ब्लँकेट घ्या आणि आम्हालाच रुबाब दाखवा, असं प्रशांत किशोर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली.
प्रशासनाने गांधी मैदानात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. तरीही तेथे असंख्य आंदोलक जमले. जिल्हा पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या पक्षाचे अध्यक्ष मनोज भारती, शहरस्थित शिक्षक रमांशु मिश्रा आणि ६०० जणांसह २१ अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर केल्याच्या निषेधार्थ विरोधक आज नितीश कुमार सरकारविरोधात आंदोलन करणार असून सोमवारी (३० डिसेबंर) बिहार बंद आणि धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान काल रात्री एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना आंदोलनकारी विद्यार्थ्यांनी प्रशांत किशोर यांना फटकारले. “आमच्या आंदोलनाचे राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. प्रशांत किशोर म्हणाले होते की, आंदोलनात मी पुढे राहिन. मात्र त्यांनी मधूनच पळ काढला. आम्हाला राजकारणाचा शिकार व्हायचे नाही. आम्हाला फक्त फेरपरीक्षा हवी आहे.”
दरम्यान बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रशांत किशोर यांच्यावर जोरदार टीका केली. प्रशांत किशोर यांनी आंदोलन स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही बिहार लोकसेवा आयोगाच्या विषयावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले मात्र त्याचे उत्तर मिळाले नाही. सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळ करत असून लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा रद्द व्हायलाच हवी.