UP man arrested for foot fetish: पोलिसांसमोर रोज नव्या प्रकारचे गुन्हे येत असतात. माथेफिरू आरोपींनी केलेल्या गुन्ह्यांची उकल करत असताना पोलिसांसह समाजाचेही डोके चक्रावूण जाते. उत्तर प्रदेश पोलीस सध्या अशाच एका गुन्ह्याचा छडा लावत आहेत. पोलिसांनी एका २५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला महिलांच्या पायाचे फोटो काढून ते जमविण्याचा छंद होता. कधी चोरून, कधी जवळीक साधून तर कधी कधी महिलांना पैसे देऊन आरोपी महिलांचे फोटो गोळा करत होता. हाथरस येथील एका महिलेने १ फेब्रुवारी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दीपक शर्मा नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले. सोशल मीडियावरून ओळख करून या तरुणाने महिलेकडे पायाचा फोटो मागितला होता.
महिलेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर मुळचा अलीगड येथे राहणाऱ्या दीपक शर्माला हाथरस येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दीपक शर्माने गुन्हा तर कबूल केलाच, त्याशिवाय त्याला पायांचे फोटो घेण्याचा छंद असल्याचे सांगितले. सोशल मीडियावरून महिलांशी मैत्री करून नंतर आरोपी महिलांच्या पायाचे फोटो मागायचा. जर एखाद्या महिलेने त्यास नकार दिला तर तो धमकीही द्यायचा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
फोन तपासल्यानंतर धक्कादायक खुलासा
पोलिसांनी जेव्हा आरोपीचा फोन तपासला तेव्हा त्यात १००० हून अधिक पायाचे फोटो आढळून आले. तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले होते की, आरोपीने स्नॅपचॅटवरून महिलेला ऑक्टोबर २०२४ मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. हाथरसचे पोलीस अधीक्षक चिरंजीव नाथ सिन्हा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, महिलेने आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर सुरुवातीला तो अशाच गप्पा मारायला लागला. पण त्यानंतर त्याने हळूहळू रंग दाखविण्यास सुरुवात केली. काही काळाने तो तिच्या पायाचे फोटो मागू लागला. जेव्हा महिलेने यासाठी नकार दिला, तेव्हा आरोपीने तिला पैसे देण्याचे आमिष दाखवले. पण यासाठीही महिलेने नकार देताच, आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
पोलिसांनी आरोपी दीपक शर्मावर आयटी कायद्याच्या कलम ६६ डी आणि भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३५१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक सिन्हा म्हणाले की, माझ्या कारकिर्दीत मी अशा प्रकारचा गुन्हा कधीही ऐकला किंवा पाहिला नव्हता. आरोपीला सध्या पोलीस कोठडी देण्यात आली आहे.