ध्वनी प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, याबाबत आपण अनेकदा ऐकलं असेल. पण ध्वनी प्रदूषणामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण मध्य प्रदेशातील उज्जैन याठिकाणी अशीच एक घटना घडली आहे. येथील एका तरुणाचा लग्नाच्या वरातीत नृत्य करत असताना अचानक मृत्यू झाला आहे. डीजेच्या आवाजामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा डॉक्टरांकडून केला जात आहे. संबंधित तरुण आपल्या काही मित्रांसह लग्नाच्या वरातीत बेभान होऊन नाचत होता. दरम्यान तो अचानक जमिनीवर कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
लाल सिंग असं मृत पावलेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्याच्या अंबोडिया येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी तो ताजपूर याठिकाणी आपल्या मित्राच्या लग्नाला गेला होत. लग्नाची वरात निघाल्यानंतर मृत तरुण लाल सिंग आपल्या मित्रांसमवेत डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचत होता. यावेळी त्यांनी नृत्य करतानाचे अनेक व्हिडीओ देखील काढले. सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना १८ वर्षीय लाल सिंगची अचानक शुद्ध हरपली आणि तो जमिनीवर कोसळला.
ही घटना घडताच त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण येथील डॉक्टरांनी त्याला उज्जैन येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उज्जैन येथील रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून तरुणाला मृत घोषित केलं.
डीजेच्या आवाजामुळेच तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. १८ वर्षीय लाल सिंगच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवर वाजवल्या जाणाऱ्या आवाजामुळे तरुणाच्या हृदयात रक्ताची गाठ निर्माण झाल्याचा दावा उज्जैन रुग्णालयात काम करणारे डॉ. जितेंद्र शर्मा यांनी केला आहे.
डॉ. जितेंद्र शर्मा यांनी आपल्या दाव्यात म्हटलं की, “जेव्हा डीजे किंवा इतर कोणत्याही मोठ्या साउंड सिस्टममधून मोठ्या आवाजात संगीत वाजवलं जातं. तेव्हा मानवी शरीरात असामान्य शारीरिक प्रतिक्रिया घडू शकते.ठरावीक पातळीपेक्षा अधिक डेसिबलचा आवाज मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतो. याचा हृदय आणि मेंदूसारख्या अंतर्गत अवयवांवर परिणाम करू शकतो,” असंही ते म्हणाले.