‘व्हॅलेंटाइन डे’ला विरोध दर्शवणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी यंदा व्हॅलेंटाइन डेला चक्क हिरवा कंदीलच दाखवला आहे. ‘प्रेम हा तरुण-तरुणींचा अधिकार असून यंदा व्हॅलेंटाइन डेच्या विरोधात आंदोलन करणार नाही’ असे जाहीर करत तोगडियांनी तरुणाईला एक ‘प्रेमळ’ धक्काच दिला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी रविवारी चंदिगडमध्ये विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, प्रेम नाही केले तर लग्न नाही होणार आणि लग्न नाही केले तर ही सृष्टी कशी चालणार. तरुण- तरुणींना प्रेम करण्याचा अधिकार आहे. त्यांना तो अधिकार मिळालाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आमच्या मुलाला आणि मुलीला प्रेमाचा अधिकार आहे हा संदेश मी सर्वांपर्यंत पोहोचवला आहे, असे त्यांनी नमूद केले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने व्हॅलेंटाइन डेला नेहमीच विरोध दर्शवला असून व्हॅलेंटाइन डे हिंदूविरोधी व भारतविरोधी असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

तोगडिया यांनी पाकिस्तानबाबतही भाष्य केले. सुंजवानमधील लष्करी तळावरील हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. सैन्याला पाकविरोधात युद्धाचे आदेश दिले पाहिजेत. भारतीय लष्कराने तातडीने पाकिस्तानवर हल्ला करुन त्यांना धडा शिकवावा. जगाच्या नकाशावरुन पाकिस्तानचे नावच मिटले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जम्मू- काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सरकारवरही त्यांनी टीका केली. सैन्यावर दगडफेक करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश सरकार कसे काय देऊ शकते. दगडफेकीसारख्या घटना थांबल्या पाहिजे. तसेच काश्मिरी हिंदूनाही त्यांचे हक्काचे घर मिळालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेनेही यापूर्वी व्हॅलेंटाइन डेला विरोध दर्शवला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचा व्हॅलेंटाइन विरोध मावळला आहे. आता विहिंपनेही अशीच भूमिका घेतली आहे.

Story img Loader