केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील हरिपाद भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या युवा कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. हा कार्यकर्ता एका मंदिरात नाचायला गेला होता, तिथे त्याचा काही लोकांशी वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरथ चंद्रन नावाचा हा युवक गेल्या बुधवारी रात्री आपल्या मित्रांसोबत पुतेनकारीयल मंदिरात गेला होता. तिथल्या काही लोकांशी वाद होऊन तो रात्री उशिरा घरी परतत होता. यादरम्यान वाटेत काही लोकांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या चंद्रनला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.” हल्लेखोरांची संख्या सात ते आठ असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी त्रिशूर येथे पत्रकारांना सांगितले की, “मृत तरूण हा आरएसएसचा कार्यकर्ता होता आणि त्याला ड्रग माफियाच्या सदस्यांनी निर्दयीपणे भोसकून ठार केले. या माफियांना सरकारचं संरक्षण आहे. त्यामुळे ते मोकाट फिरत असून वाटेल ते करत आहेत. प्रकरणातील सर्व आरोपी सीपीआय (एम) चे कार्यकर्ते आहेत. अशा समाजकंटकांना रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात एलडीएफ सरकार अपयशी ठरलं आहे.”