India’s Got Latent case in Supreme Court : पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीविरोधात महाराष्ट्र आणि आसामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर ताशेरे ओढले आहेत.
न्यायालयाने म्हटले आहे की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही. ही अश्लीलता नाही तर ते काय आहे? आम्ही तुमच्याविरुद्धचे एफआयआर रद्द का करावेत किंवा क्लब का करावेत? असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.” पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान, रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.
“इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अनेक एफआयआरच्या संदर्भात पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. न्यायालयाने अलाहाबादियाच्या टिप्पण्यांचा निषेध करत म्हटले की, “या व्यक्तीच्या मनात कचरा भरला आहे. तुझे शब्द पालकांना आणि बहिणींना लाज वाटतील असेच आहेत. संपूर्ण समाजाला याची लाज वाटेल.”
पासपोर्ट जमा करण्याचे आदेश
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांनी अलाहाबादियाचा पासपोर्ट ठाणे पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले आणि म्हटले की ते न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय भारत सोडणार नाहीत.
कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंटच्या एका भागात अलाहाबादियाने तुच्छ विनोद करत लोकांचं लक्ष वेधलं. त्याच्या या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे संताप निर्माण झाला आणि महाराष्ट्र व आसामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. हा शो मर्यादित प्रेक्षकांसाठी होता, परंतु क्लिप्स व्हायरल झाल्या, त्यामुळे प्रतिक्रिया तीव्र झाल्या. टीका वाढत असताना अलाहबादियाने जाहीर माफी मागितली आणि कबूल केले की त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तर, समय रैनाने त्याच्या युट्यूबवरील सर्व व्हिडिओही हटवले आहेत.