ऑनलाईन प्रेम प्रकरणांची हल्ली बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेली ओळख आधी मैत्रीत व कालांतराने प्रेमात परावर्तित झाल्याचं अनेकदा ऐकायला मिळतं. पण अशा प्रकरणांत काहीवेळा प्रचंड मोठी फसवणूक झाल्याचंही दिसून आलं आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. एका २० वर्षीय युवकाचं इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेवर प्रेम जडलं. पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर जेव्हा महिलेचं खरं वय त्याला समजं, तेव्हा त्याचा पारा चढला आणि त्यानं महिलेला बेदम मारहाण केली. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
नेमकं घडलं काय?
इंडिया टुडेनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. कानपूर पोलिसानी नुकतीच एका २० वर्षीय तरुणाला अटक केली असून एका महिलेला बेदम मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. या तरुणानं ज्या महिलेला मारहाण केली, ती त्याची प्रेयसी असल्याचं नंतर पोलीस तपासात उघड झालं.
Video: जावयाचा सासूवर जडला जीव; सासऱ्याला कळताच लावले दोघांचे लग्न
यासंदर्भातील वृत्तानुसार, संबंधित २० वर्षीय तरुणाची इन्स्टाग्रामवर एका महिलेशी ओळख झाली. प्रारंभी या व्यक्तीने आपलं वय २० असल्याचं त्याला सांगितलं. दोघांचीही इन्स्टाग्रामवरील मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचं ठरवलं. पण इथेच घोटाळा झाला.
प्रत्यक्ष भेटीत खरं वय उघड झालं अन्…
जेव्हा हे दोघे एकत्र भेटले, तेव्हा तरुणाचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. कारण इन्स्टाग्रामवरच्या फोटोमध्ये तरुण दिसणारी समोरची महिला प्रत्यक्षात मात्र फार वयस्कर दिसत होती. जेव्हा प्रारंभिक चर्चेमध्ये तरुणानं महिलेची विचारपूस केली, तेव्हा तिचं वय २० नसून चक्क ४५ असल्याचं त्याच्या लक्षात आलं. यामुळे तरुणाचा पारा चढला आणि त्यानं सदर महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानं शेवटी महिलेचं डोकं जमिनीवर आपटलं आणि घटनास्थळावरून पळ काढला. त्यानं महिलेचा मोबाईलही सोबत नेला.
इथेच सगळं संपलं नाही, महिलेनं तक्रार केली की…
दरम्यान, सदर महिलेनं नंतर पोलिसांत मारहाणीची तक्रार दाखल केली. मात्र, या तक्रारीमध्ये महिलेनं खरं कारण सांगितलंच नाही. एका अज्ञात व्यक्तीनं आपल्याला मारहाण केली असून त्यानं आपला मोबाईल फोनही चोरला, अशी तक्रार महिलेनं पोलिसांकडे केली. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्यांना या तरुणाचा ठावठिकाणा लागला. त्याला अटक केल्यानंतर खरा प्रकार पोलिसांसमोर आला. यासंदर्भात कानपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.