कोरोना काळात खासगी हॉस्पिटलने रुग्णांची लूट केल्याच्या अनेक बातम्या समोर आलेल्या होत्या. खासगी हॉस्पिटलच्या अनागोंदी कारभाराविरोधात अनेकदा सामाजिक, राजकीय कार्यकर्ते आंदोलन देखील करत असतात. मात्र खासगी हॉस्पिटलची अरेरावी काही केल्या कमी होत नाही. लखनऊ मधून असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलचं बिल थोडं कमी करावं अशी विनंती रुग्णाचा नातेवाईक असलेल्या युवकाने केली. यानंतर वादविवाद होऊन या युवकाला हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी निर्वस्त्र करत पट्ट्याने मारहाण केली. हॉस्पिटलची महिला कर्मचारी देखील या युवकाला मारहाण करत होती. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
युपी तक या वेबसाईटने केलेल्या बातमीनुसार सदर व्हिडिओ हा लखनऊच्या फैजुल्लागंज येथील मेड स्टार नामक एका खासगी हॉस्पिटलचा आहे. या हॉस्पिटलमध्ये रामअवतार नावाचा रुग्ण उपचारासाठी आला होता. त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आल्यानंतर हॉस्पिटलने अडीच लाखाचे बिल सदर रुग्णाच्या नातेवाईकांना दिले. यानंतर नातेवाईकांनी या बिलात ७५ हजारांची सूट द्यावी, अशी विनंती हॉस्पिटलकडे केली.
Covid 19: जानेवारी महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये…; डॉक्टर रणदीप गुलेरिया यांचं महत्त्वाचं विधान
मात्र हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि नातेवाईकांपैकी असलेल्या एका युवकाची बिलावरुन बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या युवकाला कर्मचारी असलेल्या महिलेने देखील पट्ट्याने मारहाण केली. तसेच इतर कर्मचारी देखील त्याला मारहाण करत होते. सदर युवक हात जोडून माफी मागत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. केवळ बिल कमी करण्यास सांगितले म्हणून अशा पद्धतीने अमानुष मारहाण करणे चुकीचे असल्याचे मत अनेक नेटीझन्स व्यक्त करत आहेत.
उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्य शल्यचिकीत्सक यांच्या अधिपत्याखाली ही चौकशी होणार असून त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच हे हॉस्पिटल चालविणाऱ्या रियाज नामक व्यक्तीला देखील चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.