दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय लढाईत भाजप व काँग्रेसच्या युवक संघटनादेखील परस्परांविरोधात रस्त्यावर उतरल्या आहोत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरासमोर केलेल्या निदर्शनांचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे पन्नासेक कार्यकर्ते आज, बुधवारी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी धडकले.  हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी एका कंपनीला कार्यसमाप्तीसाठी मुदतवाढ देण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी केला होता. त्यानंतर भाजयुमो अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी धडक मोर्चा नेत काँग्रेसला थेट आव्हान दिले. त्यावर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव व पन्नासेक कार्यकर्त्यांनी राजनाथ सिंह यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या भाजपने आधी आत्मपरीक्षण करावे. राजनाथ सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात दोन भ्रष्टाचारी मंत्री होते. तेव्हा भाजपला भ्रष्टाचाराची आठवण आली नाही का, असा सवाल सातव यांनी विचारला.

Story img Loader