Mobile Battery Explodes In Hot Oil: मोबाइल हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. प्रत्येकजण जिथे तिथे मोबाइल वापरण्यात दंग असतो. मोबाइलचा अतिरिक्त वापर मात्र अनेकदा जीवघेणा ठरू शकतो. रिल बनविताना, फोटो काढताना किंवा मोबाइलमध्ये तल्लीन झालेले असताना अनेकांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. आता मध्य प्रदेशमधून एक अजब घटना समोर आली आहे. जेवण बनविताना मोबाइल स्वतःजवळ ठेवल्यामुळे एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. मोबाइलचा स्फोट झाल्यामुळे एक युवक गंभीर जखमी झाला होता. त्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकी घटना काय होती?
भिंड जिल्ह्यातील लहार गावातील एक युवक घरात जेवण बनवत होता. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवून तो भाजी टाकण्याच्या तयारीत होता. मात्र तेवढ्यात त्याच्या खिशातील मोबाइल कढईत पडला. ज्यामुळे मोबाइलच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि युवक गंभीर जखमी झाला. यानंतर युवकाला लहार गावातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर युवकाला ग्वाल्हेर येथे पुढील उपचारासाठी घेऊन जा असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र युवकाचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.
ट्राफिकमुळं दुसरा रस्ता निवडला आणि घात झाला
मृत युवकाचे नाव चंद्रप्रकाश कुशवाहा आहे. लहार गावात उपचार घेतल्यानंतर युवकाचे नातेवाईक ग्वाल्हेरला रुग्णवाहिकेतून जात होते. मात्र रस्त्यात सिंद नदीवरील छोट्या पुलावर वाहतूक कोंडी होती. त्यामुळे रुग्णवाहिका दुसऱ्या पर्यायी मार्गाने घेऊन जाण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी ८० किमींचा वळसा घालून जावे लागले. ज्यामुळे जखमांनी विव्हळणारा चंद्रप्रकाश रस्त्यातच मरण पावला.
चंद्रप्रकाशच्या काकांनी सांगितले की, चंद्रप्रकाशने जेवण बनविताना मोबाइल खिशात ठेवला नसता तर त्याचा स्फोटही झाला नसता. तसेच आम्ही ग्वाल्हेरला जर वेळेत पोहोचलो असतो तर आज चंद्रप्रकाश जिवंत असता. चंद्रप्रकाश हा घरातला एकमेव कमवता व्यक्ती होता. त्याच्यामागे पत्नी, दोन मुले आहेत. एक १४ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा असे त्याचे कुटुंब मागे उरले आहे.