Premium

Exclusive: दारुबंदी असलेल्या चंद्रपूरमधील तरुणाई ब्राऊन शुगरच्या आहारी

ब्राऊन शूगर नागपूरमधून तर गांजा प्रामुख्याने अमरावतीतून येतो

तरुणाई ब्राऊन शुगरच्या आहारी
तरुणाई ब्राऊन शुगरच्या आहारी

‘माल भारी चाहीये भय्या… बस नशा होनी चाहीये… बहोत पोट्टे लेने को तयार है… २०० ते ३०० मे पुडी मिल जाती ना.. दारुबंदी होने के बाद से लडके ब्राऊन शुगर के पिछे लग गये… धंदा बहोत तेजी से बढ रहा…’, अवघ्या २२- २३ वर्षांचा चिंटू (नाव बदललेले) शहरातील ब्राऊन शूगरच्या व्यवसायाबद्दल सांगत होता.

श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात राबवलेले दारूमुक्ती अभियान आणि निवडणूक काळात मतदारांना दिलेली वचनपूर्ती करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूरमध्ये दारूबंदी जाहीर केली. दारुबंदीनंतर चंद्रपूरमध्ये आता ब्राऊन शूगर, गांजा हा धंदा तेजीत असल्याचे दिसून येत आहे.

चंद्रपूरमध्ये फेरफटका मारल्यास ब्राऊन शूगर आणि गांजा याची व्यसनाधीनता वाढल्याची चिंता अनेकजण व्यक्त करतात. यानंतर ब्राऊन शूगरचे व्यसन करणाऱ्या तरुणांनाशी चर्चा केली असता या रॅकेटविषयीची धक्कादायक बाब समोर आली. अवघ्या १५० ते ३०० रुपयांपर्यंत ब्राऊन शूगरची ‘पुडी’ मिळते, असे एका तरुणाने सांगितले. ब्राऊन शूगरच्या दर्जानुसार हा दर ठरवला जातो. या व्यवसायात शहरातील बाबू पेठेतील छोटू गोवर्धन, सोनू सरदार आणि दादमल परिसरातील आवेश या तिघांकडे सर्वात जास्त ब्राऊन शूगर उपलब्ध असल्याचे या तरुणांनी सांगितले. (या तिघांची हे टोपणनावे आहे, पूर्ण नाव माहित नसल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे.) या व्यवसायात एक महिला देखील सक्रीय असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

चांगल्या दर्जाची पुडी ३०० रुपयांपर्यंत मिळते. ब्राऊन शूगर नागपूरमधून तर गांजा प्रामुख्याने अमरावतीतून येत असल्याचे  सांगितले जाते. सध्या निवडणूक काळात पोलिसांची कारवाई वाढली आहे, वाहनांची कसून तपासणी केली जात असल्यामुळे शहरात मोजक्याच लोकांना माल उपलब्ध होतो असं या रॅकेटशीसंबंधीत लोक सांगतात. जे तरुण आधी व्यसन करायचे, तेच आता विक्री देखील करु लागले आहेत. “पहले से ही बेरोजगार है, कम से कम इधर से तो पैसे कमालेंगे”, असे एका तरुणाने सांगितले. ‘ये पावडर की लत बुरी है’, असे देखील त्याने मान्य केले. दारुबंदीनंतर शहरात दारुची अवैध मार्गाने विक्री केली जाते. भेसळ केलेले मद्य महागड्या दरात घेण्याऐवजी तरुण या व्यसनाकडे वळू लागल्याचे चित्र दिसत आहे.

अशी आहे कार्यपद्धत?

शहरातील महाविद्यालयात जाणारे तरुणांना लक्ष्य केले जाते. सुरुवातीला १०० रुपयांमध्ये पुडीची विक्री होते. हळूहळू पुडीचे दर वाढवले जातात. एकदा तरुण आहारी गेला की तो कोणत्याही परिस्थितीत ‘पुडी’साठी पैशांची सोय करतो. एका तरुणाने या व्यसनापायी स्वत:ची महागडी बाईक १० हजार रुपयांमध्ये गहाण ठेवली होती, अशी खेदजनक घटना एका स्थानिकाने सांगितली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youth in chandrapur got addicted to drugs like brown sugar ganja charas after liquor ban

First published on: 08-04-2019 at 10:17 IST

संबंधित बातम्या