बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. मागील निवडणुकांच्या वेळेस पक्षांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण मतदार आता नेते मंडळींना करुन देऊ लागले आहेत. याचाच फटका बिहारमधील गया येथील भाजपाच्या खासदाराला बसला. गयामधील कोच येथे तरुणांनी औरंगाबादचे भाजपा खासदार सुशील कुमार सिंघ यांच्या गाडीला घेरलं. भाजपाने मागील निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत असा नाराजीचा सूर लावत घोषणाबाजी केली. तरुणांच्या घोषणाबाजीमुळे भाजपा खासदारला तेथून काढता पाय घ्यावा लागल्याचे या घटनेचा व्हिडिओ शेअर करत न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

केंद्र सरकार तसेच राज्य सरकार तरुणांना रोजगार देण्यासंदर्भात कोणतीही पावले उचलत नसल्याचा आरोप या तरुणांनी केला. तरुणांनी खासदाराचा ताफा अडवला. नोकऱ्या द्या अशी घोषणाबाजी तरुणांनी केली. यावेळी खासदाराने तरुणांना मोदी सरकारने केलेल्या कामांचा दाखला दिला. मात्र तरुणांनी त्यांना लोकसभा निवडणुकांनंतर येथे रोजगारासंदर्भात कोणतेच काम झालेले नाही. या क्षेत्रातील तरुणांच्या रोजगारासाठी काहीतरी करा अशा मागण्या या तरुणांनी खासदारासमोर ठेवल्या. या क्षेत्रातील तरुणांच्या बेरोजगारीकडे राज्य तसेच केंद्राचेही दूर्लक्ष होत आहे असंही तरुणांने सांगितले.  स्थानिक नेत्यांविरोधात तरुणांनी ‘नोकऱ्या द्या… नोकऱ्या द्या…’, ‘मुर्दाबाद.. मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या.

आणखी वाचा- सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ २६ कंपन्यांचे केंद्र सरकार करणार खासगीकरण; पाहा RTI मधून समोर आलेली संपूर्ण यादी

खासदाराच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करुन तरुणांना शांत राहण्यास सांगितले. मात्र तरुणांनी खासदाराला आपल्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. सिंघ यांनीही तरुणांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी घोषणाबाजीमुळे निर्माण झालेल्या गोंधळातून खासदाराने तेथून काढता पाय घेतला. खासदाराचा ताफा निघून गेल्यानंतरही तरुणांकडून नोकऱ्या देण्यासंदर्भातील मागण्यांची घोषणाबाजी केली जात होती. या घटनेचा व्हिडिओ स्थानिकांमध्ये व्हायरल झाला आहे.

Story img Loader