You Tube Village Of India: छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून फक्त एक तासाच्या अंतरावर तुलसी हे छोटेसे गाव आहे. या गावाने भारतातील ‘युट्यूब व्हिलेज’ म्हणून नाव कमावले आहे. या गावातील ४,००० रहिवाशांपैकी १,००० हून अधिक रहिवासी यूट्यूबसाठी कंटेंट तयार करतात. २०१६ मध्ये जय आणि ज्ञानेंद्र शुक्ला या दोन रहिवाशांनी व्हिडिओ कंटेंट निर्मितीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ एडिटिंग किंवा डिजिटल निर्मितीचा कोणताही अनुभव नसलेले जय, शिक्षक आहेत, तर ज्ञानेंद्र माजी नेटवर्क इंजिनिअर.
जय आणि ज्ञानेंद्र यांना सुरुवातील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कॉपीराइट समस्यांमुळे व्हिडिओ अनेकदा काढून टाकले जात होते. तसेच त्यांच्याकडे पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या होत्या. पण, न डगमगता, त्यांनी चिकाटी दाखवली आणि २०१८ मध्ये, युट्यूबवर ‘बीइंग छत्तीसगढिया’ हे चॅनल लाँच झाल्यानंतर त्यांच्या चिकाटीला फळ मिळाले. एका लहान, प्रायोगिक उपक्रमाच्या रूपात सुरू झालेले हे चॅनेल लवकरच खूप मोठे झाले. या चॅनेलला हजारो सबस्क्राइबर्स मिळाले आणि निर्मात्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. याबाबत ज्ञानेंद्र यांनी बेटर इंडियाला माहिती दिली होती. असे वृत्त मनी कंट्रेलने दिले आहे.
काय असतात व्हिडिओचे विषय
जय आणि ज्ञानेंद्र यांच्या या यशामुळे गावातील इतरांनाही व्हिडिओ कंटेंट निर्मितीमध्ये उतरण्याची प्रेरणा मिळाली आणि लवकरच, तुलसी गाव युट्यूब व्हिडिओ निर्मात्यांचे केंद्र बनले. आज, तुलसी गावात प्रत्येक रस्त्यावर, गल्लीत आणि चौकात नृत्य सादरीकरणापासून ते विनोदी स्किट्स आणि DIY व्हिडिओंपर्यंत सर्व काही शूट केले जात आहे.
तुलसीतील व्हिडिओ कंटेंट क्रिएटर्स, त्यांचे व्हिडिओ सर्वांना पाहता येतील असे आणि त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नसेल याची काळजी घेतात. त्यांच्या व्हिडिओंमध्ये बहुतेकदा परंपरा, शेती, स्थानिक निवडणुका, गावातील रीतिरिवाज आणि परंपरा जपण्यावर लक्ष केंद्रित केलेल असते.
महिन्याची कमाई
आज, तुलसीमधील व्हिडिओ क्रिएटर्सचे युट्यूबवर सुमारे ४० चॅनेल्स आहेत, ज्यांची संख्या वाढतच चालली आहे. ‘बॅक बेंचर्स क्रिएशन’ (२४,८००+ सबस्क्राइबर्स) आणि ‘निमगा छत्तीसगढिया’ (९,२००+ सबस्क्राइबर्स) सारखे चॅनेल्स लोकप्रिय होत आहेत. बहुतेक चॅनेल युट्यूब जाहिरातींच्या उत्पन्नातून महिन्याला २०,०००-४०,००० रुपये कमवतात. जाहिरातींव्यतिरिक्त, काही निर्मात्यांना छोट्या-मोठ्या जाहिराती आणि उत्पादनांच्या जाहिरातींसाठी करार मिळाले आहेत.