हल्ली जागोजागी यूट्यूबर्स वेगवेगळ्या विषयांचे व्हिडीओ शूट करताना पाहायला मिळतात. आसपासचे नागरिक त्याकडे उत्सुकतेनं पाहात असता. काही यूट्यूबर्स महत्त्वाच्या विषयांवरही या व्हिडीओंच्या माध्यमातून भाष्य करताना दिसतात. पण काही यूट्यूबर्स मात्र या प्रयत्नात अडकतात आणि प्रसंगी मोठ्या अडचणीतही सापडतात. असाच काहीसा प्रकार बेंगलुरूच्या एका २३ वर्षीय यूट्यूबरच्या बाबतीत घडल्यायचं समोर आलं आहे. या यूट्यूबरनं शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्याला चक्क पोलिसांनी अटक केली. तसेच, बंगळुरू विमानतळ सुरक्षा व्यवस्थापनानं त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली!
नेमकं घडलं काय?
१२ एप्रिल रोजी विकास गौडा नामक एका यूट्यूबरनं त्याच्या चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओमध्ये विकासनं बेंगलुरू विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर आक्षेप नोंदवले. विकासनं या व्हिडीओमध्ये असा दावा केला की तो स्वत: बेंगलुरू विमानतळावर तब्बल २४ तास कोणत्याही आडकाठीशिवाय, कुणीही अडवल्याशिवाय फिरत होता. त्याला कोणत्याही सुरक्षा रक्षकानं किंवा विमानतळ कर्मचाऱ्यानं हटकलं नसल्याचा दावा विकासनं व्हिडीओमध्ये केला आहे.
विकासच्या यूट्यूब चॅनलला १ लाख १३ हजार सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनलवर हा व्हिडीओ पब्लिश झाल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली. विमानतळ सुरक्षा व्यवस्थापनाकडून या व्हिडीओबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी कारवाई केली.
बेंगळुरू पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, विकासनं ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून ६ मिनिटांनी बेंगळुरूहून चेन्नईला जाणाऱ्या AI-585 या विमानाचं तिकीट काढलं. सर्व आवश्यक प्रक्रियापूर्ण करून विकास विमानतळावर दाखलही झाला. मात्र, या विमानात जाण्याऐवजी आपण विमानतळावरच फिरत राहिलो, असा दावा त्यानं केला आहे.
CISF नं फेटाळला दावा
दरम्यान, विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स अर्थात CISF नं यासंदर्भात दाखल तक्रारीमध्ये विकासचा दावा खोडून काढला आहे. विकास चुकीची माहिती पसरवत असून त्या दिवशी तो २४ तास विमानतळावर नव्हताच, अशी बाजू सीआयएसएफनं मांडली आहे. तसेच, तो फक्त ५ तासांसाठी विमानतळावर होता, त्यानंतर तो विमानतळाबाहेर पडला. त्याचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला असून न्यायालयात अर्ज करून त्याला तो परत घ्यावा लागणार आहे. विकासनं हे सगळं प्रसिद्धीसाठी केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
विकासला अटक केल्यानंतर जामिनावर सोडण्यात आलं आहे. मात्र, पोलिसांकडून बोलावणं आल्यानंतर त्याला चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर राहावं लागणार आहे.