भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार हा जगभरातल्या क्रिकेटप्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे या सामन्याबाबतची सर्व माहिती, त्यासंदर्भातील प्रश्न अशा अनेक बाबी वेगवेगळी माध्यमं, यूट्यूबर्स आपल्या चॅनलवरून या सामन्याबाबत जनमानसाची प्रतिक्रिया टिपत असतात. यातून अनेक मुद्दे जगभरातल्या क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहोचत असतात. पण असाच एक व्हिडओ शूट करणं एका यूट्यूबरच्या जिवावर बेतलं आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडीओ शूट करणाऱ्या एका यूट्यूबरची पाकिस्तानच्या कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेचं CCTV फूटेज सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साद अहमद असं २४ वर्षीय मृत यूट्यूबरचं नाव आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये गेल्या आठवड्यात ४ जून रोजी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये ९ जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना झाला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यासंदर्भात कराचीमधील लोकांच्या प्रतिक्रिया घेणारा व्हिडीओ साद अहमदला तयार करायचा होता. मात्र, त्याने विचारलेल्या प्रश्नांमुळे संतप्त झालेल्या एका सुरक्षारक्षकानं त्याच्यावरच गोळ्या झाडल्या.

नेमकं काय घडलं ४ जूनला?

४ जून रोजी, म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या पाच दिवस आधी साद अहमद कराचीच्या सेरेना मोबाईल मार्केटमध्ये आपल्या व्लॉगसाठी शूटिंग करायला गेला होता. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते साद अहमदनं वेगवेगळ्या दुकानदारांच्या प्रतिक्रिया त्याच्या कॅमेऱ्यामध्ये शूट करून घेतल्या. त्याचवेळी तो एका दुकानाबाहेर उभ्या असलेल्या गुल हसन नावाच्या सुरक्षारक्षकाकडे आला.

‘स्पेसएक्स’च्या महिला कर्मचाऱ्यांशी लैंगिक संबंध, मुलं जन्माला घालण्यास दबाव; एलॉन मस्क यांच्यावर गंभीर आरोप

गुल हसनला सादनं सामन्याबाबत विचारणा केली. सादनं गुल हसनला नेमका कोणता प्रश्न विचारला होता, याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. पण सादच्या प्रश्नामुळे गुल हसन चांगलाच संतापला. त्यानं त्याच्याकडच्या बंदुकीतून सादवर गोळी झाडली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज सध्या व्हायरल होत असून त्यात सादवरील हल्ल्याचा प्रसंग दिसत आहे.

काय आहे CCTV फूटेजमध्ये?

सध्या व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये साद एका दुकानाबाहेरील सुरक्षा रक्षकाला त्याची प्रतिक्रिया विचारण्यासाठी गेल्याचं दिसत आहे. त्यांच्यात काही सेकंदांचं संभाषण होताच सुरक्षारक्षक सादवर गोळी झाडत असल्याचंही या फूटेजमध्ये दिसत आहे. गोळी लागताच साद तिथल्या तिथे जमिनीवर कोसळला. त्यानंतर लगेचच आसपासच्या लोकांची गर्दी तिथे जमा झाली.

स्थानिक पोलीस तातडीने तिथे दाखल झाले व त्यांनी साद अहमदला नजीकच्या अब्बासी शाहीद हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं. पण तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं.

गोळी का झाडली? गुल हसन म्हणतो…

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून सुरक्षारक्षक गुल हसनला अटक केली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान गोळी नेमकी का झाडली? अशी विचारणा त्याला करण्यात आल्यानंतर साद अहमदचं वर्तन योग्य नव्हतं, त्यामुळे आपल्याला राग आला आणि आपण गोळी झाडली, असं गुल हसननं सांगितलं. पोलिसांनी गुल हसन आणि त्याच्या सुरक्षा सेवा कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, गुल हसनची बंदूकही पोलिसांनी जप्त केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtuber shot dead in karachi pakistan for making vlog in ind vs pak t20 match pmw
Show comments