पीटीआय, अमरावती
तिरुपती येथील लाडू भेसळीच्या मुद्द्यावरून वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देत या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू खोटे पसरवण्यात निष्णांत असल्याचा आरोप करत त्यांना फटकारण्याची मागणीही रेड्डी यांनी मोदींकडे केली आहे. नायडू केवळ राजकीय हेतूंसाठी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवत असल्याचा आरोपही रेड्डी यांनी केला आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या संरक्षक प्रक्रियेची माहिती देतानाच रेड्डी यांनी आठ पानी पत्रात नायडू यांच्या कृतीमुळे केवळ मुख्यमंत्र्यांचाच नव्हे तर सार्वजनिक जीवनात ‘टीटीडी’ची पवित्रता आणि त्यांच्या पद्धती आदी सर्वांचा दर्जाही खालावल्याचा आरोप केला. ‘सर, या क्षणाला संपूर्ण देश तुमच्याकडे पाहतो आहे. नायडू यांना कठोर पद्धतीने फटकारणे आणि सत्य समोर आणणे अत्यंत आवश्यक आहे. हे पाऊल नायडू यांनी कोट्यवधी हिंदू भाविकांच्या मनात निर्माण केलेल्या शंका दूर करण्यात आणि ‘टीटीडी’च्या पवित्रतेवर त्यांचा विश्वास पुनर्संचयित करण्यात मदत करेल,’ असे रेड्डी यांनी पत्रात नमूद केले आहे.