आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांची मोठी बहीणी वाय. एस. शर्मिला यांनी अलीकडेच त्यांचा वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शर्मिला यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. कारण काँग्रेसने शर्मिला यांना आंध्र प्रदेश काँग्रेसचा चेहरा बनवलं आहे. काँग्रेसने शर्मिला यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक शर्मिला यांच्या नेतृत्वात लढणार आहे. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिडुगू रुद्र राजू यांनी सोमवारी (१५ जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करून राजू प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. त्यानंतर पक्षाने वाय. एस. शर्मिला यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी ४ जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याआधी त्यांनी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे न करता काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शर्मिला या आंध्र प्रदेशचे दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या कन्या आहेत.
काँग्रेस पक्षप्रवेशाच्या वेळी शर्मिला म्हणाल्या होत्या की, पक्ष त्यांना जी जबाबदारी देईल ती पेलण्यास त्या समर्थ आहेत. शर्मिला म्हणाल्या होत्या, मी पक्षात कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. केवळ आंध्र प्रदेशच नव्हे तर आंदमानमध्येही मी पक्षाची जबाबदारी घेण्यास तयार आहे.
हे ही वाचा >> “मोदी स्वस्थ बसणार की राजीव गांधींप्रमाणे…”, मालदीवच्या ‘त्या’ फर्मानानंतर भाजपा नेत्याचा पंतप्रधानांना घरचा आहेर
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडून वायएसआर काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्यांची बहीण वायएस शर्मिला यांनी त्यांना साथ दिली होती. परंतु, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जगनमोहन रेड्डी यांना अटक झाल्यावर पक्षाची सूत्रे शर्मिला यांनी आपल्या हाती घेतली. भावाला अटक झाल्यावर शर्मिला यांनी आंध्र प्रदेशमध्ये पदयात्रा काढून वायएसआर काँग्रेससाठी अनुकूल वातावरणनिर्मिती केली होती. त्यामुळेच २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळालं आणि जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाले. परंतु, त्यानंतरच्या काळात जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात दुरावा निर्माण झाला. शर्मिला यांनी नंतर वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यामुळे जगनमोहन आंध्र प्रदेश तर शर्मिला तेलंगणात आपले वर्चस्व निर्माण करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, शर्मिला यांना तेलंगणात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा आंध्र प्रदेशकडे मोर्चा वळवला आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच नवी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यावर शर्मिला यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता.