आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पार्टीच्या नेत्या वाय. एस. शर्मिला यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शर्मिला यांनी एका आंदोलनादरम्यान पोलिसांशी हुज्जत घातली, महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, तसेच एका पोलिसाच्या कानशिलात लगावली. शर्मिला यांचे पोलिसांना मारहाण करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनेही त्यांचे व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहेत.
शर्मिला यांना विशेष तपास पथकाने (SIT) कार्यालयात जाताना ताब्यात घेतलं होतं. एसआयटी सध्या भरती परीक्षेच्या पेपर फुटीच्या प्रकरणाचा तपास करत आहे. ही परिक्षा राज्य सरकारकडून घेतली जाते.
एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओत शर्मिला यांची कार एसआयटीच्या कार्यालयाबाहेर उभी आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत एक महिला पोलीस कर्मचारी शर्मिला यांना पकडते आणि गर्दीतून बाजूला नेण्याचा प्रयत्न तेव्हा शर्मिला यांनी पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. तसेच दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली.
असं म्हटलं जात आहे की, पोलीस अधिकारी आणि शर्मिला यांचा वाद झाला होता. त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी शर्मिला यांना दुसऱ्या ठिकाणी नेत होत्या.
दरम्यान, शर्मिला यांच्या आई वाय. एस. विजयम्मा देखील पोलीस ठाण्यात पोलील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करताना दिसल्या. शर्मिला यांना हैदराबादमधील जुलबी हिल्स पोलीस ठाण्यात ठेवलं आहे.
हे ही वाचा >> ऑस्ट्रेलियात पाकिस्तानी लोकांकडून ‘मोदी है तो मुमकिन है’चा नारा, भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक करत म्हणाले…
हैदराबादमध्ये सध्या पेपप फुटीच्या प्रकरणाची मोठी चर्चा आहे. याविरोधात आंदोलन करणाऱ्या वायएस शर्मिला आणि वायएस विजयम्मा या मायलेकी पोलिसांशी हुज्जत घालताना, त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करताना दिसल्या.