वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश विभाजनाच्या विरोधात आज त्यांच्या निवासस्थानी उपोषण सुरू केले. आंध्रचे विभाजन करून तेलंगण या नवीन राज्याची निर्मिती करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले
जगन यांनी दीक्षा कॅप येथे सांगितले की, आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. या प्रकरणात अनेक कायदेशीर मुद्दे गुंतलेले असून या प्रश्नावर केंद्राने अवघ्या सहा आठवडय़ात तोडगा काढला याबाबत आश्चर्य वाटते. केंद्र सरकार ज्या एकांगी पद्धतीने काम करीत आहे त्याला आपला विरोध आहे. राज्य विधानसभेत ठराव करण्याशिवाय अशा प्रकारे राज्य विभाजनाचा निर्णय कसा होऊ शकतो असा सवाल जगनमोहन रेड्डी यांनी केला. विधानसभेत ठराव केल्याशिवाय राज्याचे विभाजन केल्याचे आपण तरी कधी ऐकलेले नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
कडाप्पा येथील खासदार असलेल्या जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले की, जर राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून अध्यादेश मागे घेऊ शकते तर केंद्र सरकार तेलंगण निर्मितीचा निर्णय बदलू शकत नाही असे आपल्याला वाटत नाही. या प्रश्नावर बेमुदत उपोषण करण्याची जगनमोहन यांची ही दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात त्यांनी चंचलगुडा तुरूंगात उपोषण केले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक करून त्यांना या तुरूंगात ठेवण्यात आले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने राज्याच्या विभाजनास मंजुरी दिल्यानंतरच्या काळात जगनमोहन यांना जामीन मंजूर झाला, त्यामुळे त्यांनी केंद्रावर आगपाखड करीत आंदोलन केले. बहुसंख्याक लोकांच्या भावना विचारात घेतल्याशिवाय सरकार या प्रश्नावर पुढे जाऊ शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
सकाळी साडेअकराच्या सुमारास रेड्डी यांनी आपले वडील वाय एस राजशेखर रेड्डी यांच्या पुतळ्यास श्रद्धांजली वाहून आंदोलन सुरू केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा