भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार युसूफ पठाण यांनी त्यांच्या लोकसभा प्रचारादरम्यान लावलेल्या बॅनर्सवर २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा फोटो वापरला होता. मात्र, काँग्रेसच्या तक्रारीनंतर आता निवडणूक आयोगाने युसूफ पठाण यांना हे बॅनर्स काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर युसूफ पठाण यांनीदेखील हे बॅनर्स काढण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?
युसूफ पठाण पश्चिम बंगालमधील बेहरामपूर मतदारसंघाचे उमेदवार आहेत.त्यांना तृणमूल काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळताच युसूफ पठाण यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली होती. यावेळी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांडी पोलीस ठाण्याबाहेर युसूफ पठाण यांच्या प्रचाराचे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा फोटो वापरण्यात आला होता.
या बॅनर्सवरून युसूफ पठाण यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. तसेच युसूफ पठाण यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. ”युसूफ पठाण यांनी लावलेल्या बॅनर्सवर २०११ साली विश्वचषक जिंकल्यानंतरचा फोटो वापरण्यात आला आहे. ज्यात सचिन तेंडूलकर यांना काही खेळाडूंनी खांद्यावर उलचले आहे. हे बॅनर्स थेट आचारसंहितेचे उल्लघंन करण्यात आले आहेत. त्यामुळे युसूफ पठाण यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी”, असे काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
हेही वाचा – केजरीवालांच्या विरोधात माफीचा साक्षीदार झाला, भाजपाच्या मित्रपक्षानं कुटुंबियाला दिली उमेदवारी
दरम्यान, काँग्रेसच्या या तक्रारीची दखल घेत निडवणूक आयोगाने युसूफ पठाण यांना हे सर्व बॅनर्स काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यापुढे निवडणूक प्रचारादरम्यान असे फोटो वापरू नये, असं देखील निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. त्यानुसार युसूफ पठाण यांनी देखील बॅनर्स काढून टाकण्यास सुरूवात केली आहे. यूसूफ पठाणे हे बेहरमपूरचे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांची थेट लढत काँग्रेसचे बेहरमपूरमधूनच पाचवेळा खासदार राहिलेले अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. युसूफ पठाण हे तृणमूल काँग्रेसचे स्टार प्रचारकही आहेत.