भारतीय नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांना आता झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा संस्थांच्या माहितीनुसार त्यांना धोका असल्याचे दिसून आले आहे. हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ व नौदल प्रमुख सुनील लांबा यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाणार असून, लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना आधीच ती देण्यात आली आहे.
संबंधित दलांमधील कमांडोच त्यांच्या नजीकच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत, सुरक्षेच्या पुढच्या कडीत केंद्रीय व राज्य सुरक्षा संस्थांचे जवान असतील. भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान मारले गेल्यानंतर वाढला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानात शिरून बालाकोट या खैबर पख्तुनवा प्रांतातील जैशच्या छावणीवर हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काश्मीरमध्ये लष्करी आस्थापनांना लक्ष्य करीत हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तरात एफ १६ विमानासह एकूण २४ लढाऊ जेट विमाने सामील होती.