अमेरिकन सिनेटने मुळ पाकिस्तानचे असलेले अमेरिकन जाहिद कुरेशी यांना न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात नियुक्तीस मान्यता दिली आहे. ही नियुक्ती ऐतिहासिक मानल्या जात आहे. त्यामुळे जाहिद कुरेशी यांना देशाच्या इतिहासातील पहिले मुस्लिम फेडरल न्यायाधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला. गुरुवारी झालेल्या मतदानामध्ये ८१ जणांनी ४६ वर्षीय जाहिदच्या बाजूने तर १६ जणांच्या विरोधात मतदान केले. कुरेशी सध्या न्यू जर्सी जिल्ह्यातील दंडाधिकारी न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. परंतु न्यू जर्सीच्या अमेरिकेच्या जिल्हा कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतल्यानंतर एक नवीन इतिहास तयार होईल.
२०१९ मध्ये, न्यू जर्सी जिल्ह्यासाठी दंडाधिकारी न्यायाधीश म्हणून कुरेशी हे पहिले आशियाई अमेरिकन बनले. सिनेटचा सदस्य रॉबर्ट मेनडेझ मतदानापूर्वी भाषणात म्हणाले, “न्यायाधीश कुरेशी यांनी आपली कारकीर्द आपल्या देशाची सेवा करण्यासाठी समर्पित केली आहे, आपल्याला त्यांच्या कथेतून शिकले पाहिजे कारण ही एक अशी कहाणी आहे जी फक्त अमेरिकेत शक्य आहे.”
‘जाहीद कुरेशी’ यांच्याविषयी…
जाहिद कुरेशीचा जन्म न्यूयॉर्क शहरात मुळ पाकिस्तानी असलेल्या कुटुंबात झाला होता. ९/११ च्या हल्ल्यानंतर त्यांची अमेरिकन सैन्यात भरती झाली आणि त्यांनी दोनवेळा इराकचा प्रवास केला. २०१९ मध्ये न्यू जर्सी जिल्ह्यासाठी ते पहिले आशियाई-अमेरिकन दंडाधिकारी न्यायाधीश झाले. कुरेशी यांचे वडील निसार हे डॉक्टर होते. गेल्या वर्षी वयाच्या ७३ व्या वर्षी करोनामुळे त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – कॅनडामध्ये ट्रक हल्ल्यात ठार झालेल्या मुस्लिम कुटुंबाच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर
निसार यांनी वैद्यकीय शिक्षण ढाका विद्यापीठातून पूर्ण केले. त्यावेळी हा पूर्व पाकिस्तानचा भाग होता आणि आता तो बांगलादेशचा आहे. कुरेशी यांच्या नियुक्तीचे वर्णन ऐतिहासिक मानले जात आहे, परंतु न्यायाधीश होण्यापूर्वी काही मुस्लिम गटात त्यांच्या कामाबद्दल शंका आहे. अमेरिकन बार असोसिएशनने म्हटले आहे की फेडरल बेंचवर मुस्लिमांचे उचित प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी ही नियुक्ती पहिलं पाऊल आहे.