गुलबर्गा सोसायटीतील दंगलप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना विशेष तपासणी पथकाने (एसआयटी) दोषमुक्त केल्याप्रकरणी झाकिया जाफरी यांनी स्थानिक न्यायालयात सोमवारी ‘निषेध याचिका’ दाखल केली. विशेष तपासणी पथकाने मोदी यांच्यासंबंधी सादर केलेला अहवाल रद्दबातल ठरविण्यात यावा, अशी विनंती जाफरी यांनी सदर याचिकेद्वारे केली आहे. सन २००२ मध्ये गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी हे ठार झाले होते. २८ फेब्रुवारी २००२ रोजी गुलबर्गा सोसायटीमध्ये झालेल्या हिंसाचारात जाफरी यांच्यासह ६९ जण ठार झाले होते. झाकिया जाफरी या त्यांच्या पत्नी आहेत. या प्रकरणी अन्य एका स्वायत्त तपास यंत्रणेमार्फत चौकशी करून मोदी आणि इतरांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात यावे, अशीही मागणी झाकिया जाफरी यांनी केली आहे. महानगर दंडाधिकारी बी.जी. गणात्रा यांच्या न्यायालयात सदर याचिकेवरील सुनावणी येत्या २४ एप्रिल रोजी होणार आहे.

Story img Loader