Zakir Naik Extradition PM Anwar Ibrahim : मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम भारत दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी (२० ऑगस्ट) त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींबरोबरच्या भेटीनंतर त्यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्समध्ये आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांना वादग्रस्त कथित इस्लामिक धर्मगुरू व अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर इब्राहिम अन्वर यांनी मलेशियाची स्पष्ट भूमिका मांडली. अन्वर म्हणाले, “झाकीर नाईकविरोधातील सक्षम पुरावे आम्हाला मिळाले तर त्यावर उचित कार्यवाही केली जाईल. परंतु, याबाबतची कोणतीही कार्यवाही करताना दोन्ही देशांमधील संबंधांवर नकारात्मक परिणाम होता कामा नयेत, अशी आमची भावना आहे”.
इब्राहिम अन्वर म्हणाले, “भारताने यापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु, मी येथे केवळ एका व्यक्तीबाबत बोलत नाहीये. मी दहशतवादाच्या प्रश्नावर बोलत आहे. आमचं सरकार झाकीर नाईकप्रकरणी भारत जे कोणते पुरावे सादर करेल, त्याचं स्वागतच करेल. ते पुरावे आम्ही विचारात घेऊ. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आम्ही भारत सरकारबरोबर मिळून काम करत आहोत”. झाकीर नाईक हा २०१७ मध्ये भारतातून फरार झाला होता. त्यानंतर त्याने मलेशियात शरण घेतली. त्यावेळी मलेशियाच्या पंतप्रदान महातीर मोहम्मद सरकारने त्यांना सरकारी संरक्षण दिलं होतं.
कोण आहे झाकीर नाईक? त्याच्यावरील अरोप कोणते?
५८ वर्षीय झाकीर नाईकचा जन्म मुंबईत झाला. त्याने वैद्यकशास्त्रात उच्चशिक्षण घेतलं आहे. वयाच्या २० व्या वर्षापासूनच तो धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊ लागला होता. तसेच पुढे त्याने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) नावाची संस्था स्थापन केली. मात्र यूएपीए १९६७ च्या कायद्यानुसार भारत सरकारने या संस्थेवर बंदी घातली आहे. पुढे नोव्हेंबर २०२१ मध्ये या संस्थेवरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली होती. झाकीर नाईकवर धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर देशात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यासह तो अनेक बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. तो दहशतवादी पथकाच्या रडारवर होता. मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यापूर्वीच त्याने मलेशियाला पलायन केलं.
हे ही वाचा >> Bharat Bandh : २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक; जाणून घ्या ‘बंद’मागचं नेमकं कारण?
झाकीर नाईक पीस टीव्हीवर धार्मिक प्रवचन द्यायचा. या माध्यमातून तो इतर धर्मांविरोधात द्वेष पसरवायचा. या पीस टीव्हीची स्थापना २००६ साली झाली होती. मात्र सध्या पीस टीव्हीवर भारतासह कॅनडा, ब्रिटन, बांगलादेश अशा अनेक देशांत बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने झाकीर नाईकच्या आयआरएफ या संस्थेवरही गंभीर आरोप केलेले आहेत. आयआरएफ संस्थेकडून भारताच्या सुरक्षेला धोका ठरणारी कृती केली जाते. तसेच या संस्थेमुळे शांतता तसेच सामाजिक स्वास्थ्य, बंधुता बिघडण्याची शक्यता आहे, असे केंद्र सरकारने म्हटलेले आहे.