दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील jnu विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे दिशाभूल करणारे वार्तांकन केल्याचा आरोप करीत झी न्यूजमधील एका निर्मात्याने (प्रोड्युसर) राजीनामा दिला आहे. विश्व दीपक असे या निर्मात्याचे नाव आहे. नऊ फेब्रुवारी रोजी रात्री झी न्यूज वाहिनीवरून प्रसारित झालेल्या कार्यक्रमाचा निर्माता म्हणून दीपक कार्यरत होता.
झी न्यूजच्या व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात दीपकने म्हटले आहे की, जेएनयूतील विद्यार्थ्यांनी त्या दिवशी रात्री ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचे आपल्या वाहिनीवरून प्रसारित झालेल्या कार्यक्रमात दाखविण्यात आले. प्रत्यक्षात या संदर्भातील व्हिडिओमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचे कुठेही स्पष्टपणे ऐकायला येत नाही. तरीही आपल्या कार्यक्रमामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्याचे सातत्याने दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मोठा जमाव त्यावेळी विद्यापीठाच्या परिसरात जमलेला होता आणि घोषणा देण्यात येत होत्या. विद्यापीठाच्या आवारात प्रकाश एकदम कमी होता. या स्थितीत कन्हैया कुमार आणि त्याचे साथीदारच भारतविरोधी घोषणा देत होते, हे कसे काय म्हणता येईल. ‘भारतीय कोर्ट झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या जात असताना आपल्याकडून मात्र ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचे दाखविण्यात आले, असा आरोप त्याने राजीनामा देताना केला आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दीपक म्हणाला, ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा दिल्याचे त्या व्हिडिओमध्ये कुठेही ऐकायला येत नाही. तरीही झी न्यूजकडून तशाच घोषणा दिल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोणत्या घोषणा दिल्या हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकायला येत नव्हते. झी न्यूजमध्ये त्या दिवशी वृत्तविभागात काम करणाऱ्या संपादकांनी त्या घोषणा ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा असल्याचे ठरवून तशा पद्धतीचे वृत्त प्रसारित केले.