Trump Zelensky Meeting: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील व्हाईट हाऊसमधील बाचाबाचीचा व्हायरल झालेला व्हिडिओ जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. व्हाईट हाऊसमधील या बाचाबाचीमुळे रशिया-युक्रेन युद्धाची दिशाही बदलली आहे. खरं तर, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या असा वाद होईल याची कोणालाही अपेक्षा नव्हती. हे प्रकरण इतक्या टोकाला जाईल असे कोणालाही वाटले नव्हते. याचबरोबर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान एका अमेरिकन पत्रकाराने, झेलेन्स्की यांना त्यांच्या कपड्याबाबत प्रश्न विचारला होता. तेव्हा, “तुम्हाला काही अडचण आहे का?”, असे म्हणत झेलेन्सकी यांनी उत्तर दिले.

वॉशिंग्टन डीसी येथे काल (शुक्रवारी) डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी खनिज करारावर स्वाक्षरी केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका अमेरिकन पत्रकाराने झेलेन्स्की यांना, त्यांनी सूट का घातला नाही असा प्रश्न विचारला.

“तुम्हाला काही अडचण आहे का?”

हा प्रत्रकार वोलोदिमिर झेलेन्स्की यांना म्हणाला की, “तुम्ही सूट का घालत नाही? तुम्ही या देशाच्या सर्वोच्च कार्यालयात आहात आणि तुम्ही सूट घालण्यास नकार देता. तुमच्याकडे सूट आहे का?”

झेलेन्स्कीने पत्रकाराला प्रत्युत्तर देत, “तुम्हाला काही अडचण आहे का?” असा प्रश्न विचारला. “ओव्हल ऑफिसच्या ड्रेस कोडचा आदर न करणाऱ्यांविषयी अनेक अमेरिकन नागरिकांना याची समस्या आहे,” असे पत्रकाराने उत्तर दिले. यावर युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी रशियासोबत सुरू असलेल्या युद्धाचा संदर्भ देत उत्तर दिले, “हे युद्ध संपल्यानंतर मी सूट घालेन, कदाचित तुमच्यासारखाच. कदाचित तुमच्यापेक्षाही चांगला.”

दरम्यान, झेलेन्स्की आणि पत्रकारातील हा संवाद ऐकून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झेलेन्स्की यांना म्हणाले की, “मला तुमचे कपडे खूप आवडतात.”

झेलेन्स्की यांचा पोशाख

शुक्रवारी युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांनी संपूर्ण काळ्या रंगाचा लष्कर पोशाख परिधान करून व्हाईट हाऊसला भेट दिली. हा पोशाख त्यांनी यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जगातील विविध नेत्यांबरोबरच्या भेटींमध्ये परिधान केला होता.

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या बाचाबाचीला अमेरिकेने गांभीर्याने घेईल असे मानले जात आहे. यामुळे युक्रेनला अमेरिकन मदत पूर्णपणे थांबवली जाऊ शकते. दरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आधीच युक्रेनला मदत देण्याच्या विरोधात होते, परंतु आता त्यांना आता मदत बंद करण्याची आणखी एक आयती संधी मिळाली आहे.

Story img Loader