Russia Vs Ukraine War Updates : रशिया आणि युक्रेन यांच्यात २४ फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरू आहे. बलाढ्य रशियाला युक्रेन झुंज देत असताना, त्यांचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मोठी मागणी केली आहे. झेलेन्स्की यांनी जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व मिळत नाही, तोपर्यंत युक्रेनमध्ये पाश्चिमांत देशांचे सैन्य तैनात करावे अशी मागणी केली आहे. नुकतेच किव्ह येथे वोलोदिमीर झेलेन्स्की यांची जर्मनीचे विरोधी पक्षनेते फ्रेडरिक मर्झ यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ही मागणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षांपासून नाटोमध्ये सभागी होण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न करत असलेल्या युक्रेनने म्हटले आहे की, सध्याचे युद्ध थांबल्यानंतर रशियाने पुन्हा आक्रमण करू नये यासाठी त्यांना सुरक्षेचे हमी हवी आहे. दुसरीकडे युक्रेनचा नाटोमध्ये समावेश झाल्यास आम्हाला सुरक्षेचा धोका निर्माण होईल असे रशियाचे म्हणणे आहे.

यावेळी बोलताना वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले, “युक्रेनला जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व मिळत नाही तोपर्यंत इथे एखाद्या दुसऱ्या देशाच्या सैन्याची तुकडी तैनात करण्यात यावी. यासह युक्रेनला कधीपर्यंत नाटो आणि युरोपियन संघाचे सदस्यत्व मिळेल याचीही स्पष्ट माहिती द्यावी.”

फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनमध्ये युरोपमधील देशांचे सैन्य तैनात करण्याबाबत भाष्य केले होते. मॅक्रॉन यांच्या या विधानावर त्यावेळी बराच गोंधळ झाला होता. यानंतर मॅक्रॉन यांनी युक्रेनमध्ये सैन पाठवण्याबाबत युरोपमधील देशांमध्ये एकमत नसल्याचेही म्हटले होते.

याचा संदर्भ देत वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की, “आम्हाला नाटोचे सदस्यत्व मिळाले तरी काय? याने काय होईल? आमच्या सुरक्षेची हमी कोण देणारे? त्यामुळे आपण इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या प्रस्तावाबाबत विचार करू शकतो.

यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, ते नाटोच्या सदस्यत्वाबाबत बोलण्यासाठी अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “जो बायडेन अजूनही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला अजूनही मोठे महत्व आहे. त्यामुळे पदावर येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही.”

फेब्रुवारी २०२२ पासून रशिया-युक्रेन युद्ध

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेन विरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला चढवला होता. रशियाच्या विरोधात असलेलया ‘नाटो’ संघटनेत सहभागी होण्यासाठी युक्रेन प्रयत्न करत आहे. जर युक्रेन नाटोचा सदस्य झाला तर नाटो देशांचे सैन्य युक्रेनच्या बाजून लढेल तसेच रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे म्हणत रशियाने युद्ध पुकारले होते. दरम्यान हे युद्ध अजूनही चालू असून यामध्ये दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zelensky seeks western support for ukraines future nato membership aam