कीव्ह/ वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर ओव्हल कार्यालयात झालेली खडाजंगी खेदजनक होती असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले. इतकेच नाही तर युक्रेनमध्ये कायमस्वरूपी शांतता टिकवण्यासाठी आपण ट्रम्प यांच्या कणखर नेतृत्वात काम करायला तयार असल्याचेही त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले.

ट्रम्प यांनी युक्रेनची सर्व लष्करी मदत तात्पुरत्या काळासाठी थांबवल्यानंतर काहीच तासांनी झेलेन्स्की यांनी नमती भूमिका घेतली. अमेरिकेच्या आर्थिक सहाय्याशिवाय रशियाबरोबरच्या युद्धामध्ये टिकून राहणे युक्रेनसाठी अशक्य असल्याचे मानले जाते. झेलेन्स्की यांनी लिहिले की, ‘‘वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाऊस येथे शुक्रवारी झालेली आमची बैठक आम्हाला हव्या त्या पद्धतीने पार पडली नाही. जे घडले ते खेदजनक आहे. ही वेळ बिघडलेली परिस्थिती सुधारण्याची आहे. आमचे भविष्यातील सहकार्य आणि संभाषण रचनात्मक असेल याची आम्ही खबरदारी घेऊ.’’

ट्रम्प सरकारला हवा असलेला दुर्मीळ संयुगे विक्री करार करण्याची तयारी झेलेन्स्की यांनी दर्शवली. ‘‘आपणा कोणालाही न संपणारे युद्ध नको आहे. शांततेसाठी युक्रेन शक्य तितक्या लवकर वाटाघाटी करायला तयार आहे. ट्रम्प यांच्या मजबूत नेतृत्वाखाली मी आणि माझे सहकारी काम करायला तयार आहोत,’’ असे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.

युक्रेन रशियाबरोबर शांतता प्रक्रिया राबविण्यास कटिबद्ध दिसत नाही, तोपर्यंत अमेरिकेची युक्रेनला मदत बंद राहील असे ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आले. या निर्णयामुळे युक्रेनला एक अब्ज डॉलरहून अधिक शस्त्रे आणि दारुगोळ्याच्या पुरवठा थांबणार आहे. ‘युक्रेन सिक्युरिटी आसिस्टन्स इनिशिएटिव्ह’ अंतर्गत युक्रेनला देण्यात येत असलेले कोट्यवधी डॉलरची मदतही थांबविण्यात आली.

रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला आजपर्यंत ६५.९ अब्ज डॉलरचे लष्करी सहाय्य केले आहे.

Story img Loader