Nitin Kamath On Donald Trump Tariff Wars : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पुन्हा एकदा अमेरिकेची सूत्रे आल्यानंतर त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सत्ता हाती आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प जे काही निर्णय घेत आहेत ते पाहून संपूर्ण जग अचंबित झालं आहे. यापैकी एक निर्णय म्हणजे आयात मालावरील शुल्क अर्थात टेरिफ लागू करण्यासंदर्भातील. डोनाल्ड ट्रम्प यांनी १ फेब्रुवारी रोजी कॅनडा व मेक्सिकोतून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर २५ टक्के शुल्क अर्थात टेरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच चीनवरही १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क जारी केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या अशा निर्णयाची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे.
दरम्यान, झिरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणावर चिंता व्यक्त केली आहे. “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारे टॅरिफ लादत आहेत आणि इतर देशांबद्दल विधाने करत आहेत त्यावरून असं वाटतं वाटतंय की आपण सगळे अमेरिका साम्राज्याचे भाग आहोत. टेरिफ लागू करण्यासंदर्भातील ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे असं दिसून येतंय की इतर राष्ट्रे केवळ यूएस धोरणांच्या अधीन आहेत”, असं म्हणत नितीन कामथ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ व्यापार धोरणांच्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली. यासंदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.
नितीन कामथ यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट देखील लिहिली आहे. यामध्ये कामथ यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ धोरणे शेवटी युनायटेड स्टेट्सचा जागतिक प्रभाव कमकुवत करू शकतात असं म्हटलं आहे. कारण व्यापार निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यत्यय येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असंही म्हटलं आहे.
The way Donald Trump has gone about imposing tariffs and making statements about other countries makes it feel like we are all subjects of the "US empire," if it wasn't evident till now.
— Nithin Kamath (@Nithin0dha) February 3, 2025
In terms of trade, China today is the largest trading partner for over 120 countries. In… pic.twitter.com/e6cJF9EdBP
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार असमतोल आणि इमिग्रेशनला आळा घालण्याच्या उद्देशाने कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयातीवर २५ टक्के आणि चीनमधील वस्तूंवर १० टक्के वाढीव शुल्क जाहीर केल्यानंतर या निर्णयावर टीका झाली आहे. दरम्यान, याबाबत नितीन कामथ यांनी केलेल्या पोस्टमच्या माध्यमातून व्यापार आणि आर्थिक स्थिती यांच्यातील वाढती दरी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. नितीन कामथ यांनी असंही म्हटलं की, व्यापाराच्या बाबतीत चीन आज १२० हून अधिक देशांसाठी सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि लष्करी वर्चस्वाच्या बाबतीत यूएस हे आत्तापर्यंत सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे. मात्र, टॅरिफमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र, ‘अमेरिका फर्स्ट’च्या भूमिकेमुळे परिणाम होण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.