झिका विषाणूंनी नेमके काय होते ?
झिका विषाणूमुळे नेहमीच्या फ्लूसारखा ताप येतो. दोन दिवसांनी तो कमी होतो. अंगावर थोडे चट्टे उठतात, मात्र तेदेखील काही दिवसांनी कमी होतात. साध्या वेदनाशामक गोळीनेही हा ताप आटोक्यात येतो. त्यामुळे ७० ते ८० टक्के रुग्णांना झिका विषाणूंची लागण झाल्याचे लक्षातही येत नाही. डेंग्यू, चिकनगुनिया, पितज्वरप्रमाणेच झिका विषाणूही एडिस इजिप्ती डासांमार्फत पसरतो.

सध्या झिका विषाणू कुठे आढळत आहे ?
दक्षिण अमेरिकेतील वीस देश व कॅरेबियन बेटांवर ही साथ पसरली आहे. मेक्सिकोतही रुग्ण आढळून येत आहेत. या देशातून प्रवास करून परतलेल्या फ्लोरिडा, हवाई व न्यूयॉर्क या अमेरिकेतील प्रांतांमध्ये तसेच युरोपातील पोर्तुगाल, फ्रान्स अशा काही देशांमध्येही झिका विषाणूंमुळे ताप आलेल्या रुग्णांची नोंद होत आहे. मात्र अमेरिका व युरोपमध्ये स्थानिक पातळीवर संसर्ग झाल्याची नोंद नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने झिका विषाणूंची साथ आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी (इंटरनॅशनल हेल्थ इमर्जन्सी) जाहीर केली आहे. २०१४ मध्ये इबोलासाठी अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्यापूर्वी पोलियोसाठीही आणीबाणी लावली होती. सध्या झिका विषाणूंची साथ पसरलेल्या दक्षिण अमेरिकेत आणि कॅरेबियन बेटांवर प्रवासासाठी जाण्याविषयी गर्भवती महिलांनी पुनर्विचार करावा अशा सूचना युरोप-अमेरिकेतील देशांमध्ये देण्यात आल्या आहेत. भारतात झिका विषाणूंचा एकही रुग्ण आढळलेला नाही, मात्र या साथीवर लक्ष ठेवण्यासाठी तांत्रिक समिती नेमण्यात आली आहे.

झिकाची साथ गंभीर का मानली जातेय ?

युगांडा येथील झिका जंगलात माकडाला या विषाणूंचा संसर्ग झाल्याची नोंद १९४७ मध्ये करण्यात आली. आफ्रिका, दक्षिण अमेरिकेत या विषाणूंमुळे होत असलेल्या तापाचे काही रुग्ण दिसत. मात्र २०१४ मध्ये हा विषाणू पसरत असल्याचे लक्षात आले. गेल्या वर्षी, ब्राझिलमध्ये ३,८९३ जणांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याची नोंद आहे. त्यापूर्वी २०१४ मध्ये ही संख्या केवळ १६३ होती. गेल्या वर्षी या विषाणूमुळे ४९ नवजात बालके दगावल्याचे म्हटले जाते.
झिका विषाणूंचा प्रौढांना त्रास होत नसला तरी महिलांना गर्भारपणाच्या पहिल्या तिमाहीत या विषाणूची लागण झाली तर गर्भावस्थेतील मुलाच्या मेंदूची वाढ (मायक्रोसीफली)खुंटते. आकाराने लहान डोके असलेल्या या मुलांना बोलता किंवा चालता येत नाही. अनेक मुले दगावतात. मात्र झिका विषाणूंचा या आजाराशी नेमका संबंध अजूनही निश्चित झालेला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. तसेच या विषाणूंवर अद्याप लस उपलब्ध झालेली नाही.

भारताला कितपत धोका ?
आतापर्यंत भारतात झिका विषाणूचे रुग्ण आढळलेले नाहीत. १९५२-५३ मध्ये झालेल्या अभ्यासादरम्यान काही भारतीयांच्या शरीरात झिका विषाणूंविरोधात प्रतिकारक्षमता निर्माण झाल्याचे दिसले होते. मात्र थेट विषाणू संसर्ग असल्याचे आढळले नाही. ब्राझिल तसेच दक्षिण अमेरिकेतील इतर देशांमध्ये झिकाची साथ असल्याने तेथून येणाऱ्यांमध्ये हे विषाणू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषाणूंचा संसर्ग पसरवू शकणारे एडिस इजिप्ती डास भारतात आहेत. युरोप अमेरिकेत स्थानिक पातळीवर संसर्ग झाल्याची नोंद नाही. मात्र झिकाची वाढती साथ पाहता केंद्र सरकारकडून तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे.

झिकापासून संरक्षणासाठी तयारी
मलेरिया व डेंग्यूप्रमाणेच झिका विषाणूही डासांवाटेच पसरत असल्याने डासांची संख्या नियंत्रणात ठेवणे व डासांपासून संरक्षण मिळवणे हे दोन्ही प्रतिबंधात्मक उपाय सध्या संसर्ग पसरत असलेल्या देशांमध्ये राबवले जात आहेत. या देशांमध्ये प्रवास लांबणीवर टाकावा किंवा प्रवास आवश्यक असल्यास डासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी परिणामकारक उपाय योजावेत, असा सल्ला अमेरिकेतील आरोग्य विभागाने दिला आहे. त्यापुढे दोन पावले पुढे जात स्त्रियांना गर्भारपण पुढे ढकलण्याचा सल्ला कोलंबिया, जमका, डोमिनिकन रिपब्लिकसारख्या देशांनी दिला आहे. त्यावरून या देशांमध्ये वादही सुरू आहेत.

Story img Loader