झिका विषाणूमुळे मेंदूतील पेशी मरतात त्यामुळे नवजात बालकांच्या मेंदूची वाढ कमी होते व त्यांचे डोके आकाराने लहान असते, असे अमेरिकेतील वैज्ञानिकांनी म्हटले आहे. या संशोधनामुळे झिकामुळे निर्माण होणाऱ्या मायक्रोसेफली रोगावर औषधे शोधणे शक्य होणार आहे. अमेरिकेच्या रोग प्रतिबंध संशोधन संस्थेने असे म्हटले आहे की, झिका विषाणूची लागण गर्भवती महिलांना झाली तर नवजात बालकांच्या मेंदूची वाढ नीट होत नाही. त्यामुळे त्यांचे डोके लहान असते. त्या अवस्थेला मायक्रोसेफली असे म्हणतात. सॅनडियागोतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी झिका विषाणूमुळे मेंदूतील पेशींची हानी होत असल्याचे म्हटले आहे. काही विशिष्ट यंत्रणा रोखली गेल्याने या पेशी मरतात त्यामुळे नवीन औषधोपचार शोधणे शक्य आहे. गर्भधारणेच्या तिसऱ्या आठवडय़ातील मूलपेशींच्या त्रिमिती नमुन्याचा अभ्यास करण्यात आला त्यात झिकामुळे टीएलआर ३ हा रेणू कार्यरत होतो व खरेतर या त्यामुळे विषाणूचा मुकाबला करतो, पण तो अति क्रियाशील झाल्याने मूलपेशीतील मेंदूच्या पेशींची निर्मिती करणारी जनुके बंद होतात व पेशींना आत्महत्या करायला लावणारी जनुके चालू होतात. त्यामुळे मेंदूच्या पेशींची संख्या फारच कमी असते. यात खरे तर हा रेणू विषाणूंना मारणारा असूनही तीच प्रतिकारशक्ती तो मानवी शरीराविरोधात वापरू लागतो. टीएलआर ३ कार्यान्वित झाल्याने मूलपेशींपासून मेंदूपेशी तयार करण्यात मदत करणारी जनुके रोखली जातात, पण आता टीएलआर ३ रेणूला रोखून हे सगळे थांबवता येणार आहे, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे तारिक राणा यांनी सांगितले. गर्भावस्थेतील बालकाच्या मेंदूच्या उतींचे प्रारूप यात तयार करण्यात आले होते ते गर्भधारणेपासून ९ आठवडय़ांच्या बालकाच्या मेंदूवर आधारित होते. जेव्हा झिकाचा विषाणू यात प्रवेश करता झाला तेव्हा संसर्गानंतर पाच दिवसात ऑर्गनॉइडची वाढ सरासरी १६ टक्के कमी झाली. झिका विषाणूत टीएलआर ३ जनुकास कार्यान्वित केले, तर ते अँटेना म्हणून काम करते व दुहेरी धाग्यांच्या विषाणूशी संबंधित दुहेरी आरएनए ओळखतात. हे आरएनए जेव्हा टीएलआर ३ ला चिकटतात तेव्हा प्रतिकारशक्ती प्रतिसाद देते व विषाणूविरोधात अनेक जनुके कार्यान्वित होतात, पण टीएलआर ३ या जनुकाच्या क्रियाशीलतेने मेंदूच्या पेशी व इतर पेशी यांच्यातील फरक ओळखता येत नाही त्यामुळे पेशी मरू लागतात व अपॉटोसिस क्रिया होते. टीएलआर ३ सक्रिय झाल्याने झिका संसर्गित सजीवात ऑरगनॉइड आक्रसते असा प्राथमिक अंदाज आहे. टीएलआर ३ क्रियाशील असलेले विषाणू मेंदूत गेल्यावर पेशींचे आरोग्य व ऑर्गनॉईडचा आकार बदलतो व मेंदूचे नुकसान होते, असे सेल स्टेम सेल या नियतकालिकातील शोधनिबंधात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा