ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कंपनीने ई-किराणा व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. झोमॅटोने फू़ डिलिव्हरीसह किराणा मालाची विक्रीही सुरु केली होती. काही दिवसांपूर्वी झोमॅटोनं किराणा मालाची डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय़ घेतला होता. गौरव गुप्ता झोमॅटोचे पुरवठा प्रमुख होते.
गौरव गुप्ता यांनी एक मेल पाठवत कंपनी सोडत असल्याचं जाहीर केलं असल्याचं मनीकंट्रोलनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. “कंपनीत टॉप एक्झिक्युटिव्ह म्हणून सहा वर्षे घालवल्यानंतर आता एक नवीन अध्याय सुरु करणार आहे.”, असं त्यांनी मेलमध्ये नमूद केलं होतं. “मी झोमॅटोच्या प्रेमात आहे आणि नेहमीच राहणार आहे. सहा वर्षापूर्वी इथे येताना पुढे काय होईल हे देखील माहिती नव्हतं. आतापर्यंतचा प्रवास खरंच आश्चर्य़कारक होता आणि मला याचा अभिमान वाटतो.”, असं गुप्ता यांनी सांगितलं आहे. “मी माझ्या आयुष्यातील एका नवीन वळणावर आहे. मी एक नवीन अध्याय सुरु करत आहे. गेल्या ६ वर्षात बरंच शिकायला मिळालं. झोमॅटोला पुढे नेण्यासाठी आमच्याकडे चांगली टीम आहे. आता माझ्या प्रवासात पर्यायी मार्ग शोधण्याची ही योग्य वेळ आहे. हे लिहीताना मी खूप भावुक आहे आणि मला आता काय वाटत आहे, हे मी शब्दात सांगू शकत नाही”, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.
झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्वीट करून त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत. गौरव गुप्ता यांचं सहा वर्षे कंपनीला चांगलं मार्गदर्शन लाभलं असं त्यांनी लिहीलं आहे.
Thank you @grvgpta – the last 6 years have been amazing and we have come very far. There’s so much of our journey still ahead of us, and I am thankful that we have a great team and leadership to carry us forward.https://t.co/AJAmC5ie6R
— Deepinder Goyal (@deepigoyal) September 14, 2021
झोमॅटोचे सह-संस्थापक गौरव गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर कॉर्पोरेट जगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच स्टार्ट-अपची जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. ही पहिली स्टार्ट-अप आहे, ज्याने आयपीओमधून ९ हजार कोटी रुपये कमावले आहेत. गौरव गुप्ता यांनी कंपनीच्या आयपीओ प्रक्रियेदरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती.