करोना विषाणूने सलग दोन वर्षे जगभर थैमान घातलं होतं. दोन वर्षे टप्प्याटप्याने जगभर लॉकडाऊन लावण्यात आले. या विषाणूमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. करोनातून जग सावरल्यानंतर करोनाचे इतर अनेक उपप्रकार वेगवेगळ्या देशांमध्ये आढळले आहेत. अशातच आता नव्या विषाणूचं आव्हान निर्माण झालं आहे. आर्कटिक आणि इतर बर्फाळ प्रदेशांमधील बर्फाच्या डोंगरांखाली दबलेल्या विषाणूबाबत वैज्ञानिकांनी आरोग्य संघटनेला इशारा दिला आहे. द गार्डियनच्या अहवालानुसार वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, आर्कटिक पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळे झॉम्बी विषाणू बाहेर निघू शकतो आणि यामुळे भयावह जागतिक आरोग्य आणीबाणी निर्माण होऊ शकते. ४८००० वर्षांपूर्वी हा विषाणू येथील बर्फाखाली दबला गेला असावा, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
पर्माफ्रॉस्ट ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर अथवा पृष्ठभागाच्या खाली गोठलेला बर्फाचा थर आहे. यामध्ये माती आणि वाळूदेखील असते. याच्याभोवती बर्फाचा मोठा थर असतो. परंतु, अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढू लागलं आहे. परिणामी जगभरातील अनेक प्रदेशांमधला बर्फ वितळू लागला आहे. यामुळे जगभरातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या बर्फांखाली दबलेल्या काही विषाणूंचा धोकादेखील वाढला आहे.
या नव्या विषाणूंमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी गेल्या वर्षी सायबेरियामधील पर्माफ्रॉस्टचे काही नमुने घेतले आणि त्यावर काही प्रयोग केले. या संशोधनादरम्यान, बर्फाखाली दबलेल्या विषाणूची माहिती मिळाली आहे. संशोधन करणाऱ्या या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे की, आर्कटिकमध्ये आम्हाला सापडलेला विषाणू हजारो वर्षे बर्फाखाली दबला होता.
हे ही वाचा >> “गांधींविषयीचे ते उद्गार बाळासाहेब ठाकरेंविषयीही…”, ठाकरे गटानं मांडली भूमिका; अयोध्या सोहळ्यावर टिप्पणी!
रॉटरडॅममधील इरास्मस मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञ मॅरियन कूपमॅन्स म्हणाल्या, पर्माफ्रॉस्टखाली कोणकोणते विषाणू दबले गेले असावेत, याबाबतची माहिती आमच्याकडे नाही. परंतु, आम्हाला वाटतं की, तिथे असे काही विषाणू आहेत जे या संपूर्ण जगाच्या आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात. इथल्या विषाणूंमध्ये रोगांची मोठी साथ पसरवण्याची क्षमता असू शकते. जसे की पोलिओचा एक जुना व्हेरिएंट या प्रदेशात असू शकतो. येथून नवी आव्हाने निर्माण होऊ शकतात, असं मानूनच आपल्याला संशोधन करावं लागेल.