मिझो राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष झोरमथंगा यांचा शनिवारी मिझोरामचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यांच्यासह एकूण बारा मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल के. राजशेखरन यांनी राजभवनात त्यांना अधिकारपद व गोपनीयतेची शपथ दिली.
झोरमथंगा यांनी मिझो भाषेत शपथ घेतली. ईशान्येकडील मिझोराम राज्याचे ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. यापूर्वी ते एमएनएफच्या राजवटीत १९९८ व २००३ मध्ये मुख्यमंत्री होते. तानलुविया हे उपमुख्यमंत्री झाले. झोरमथंगा यांच्यासह इतर अकरा मंत्र्यांना शपथ देण्यात आली, त्यात पाच कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री आहेत. पाच कॅबिनेट मंत्र्यांत तानलुविया, आर. लालथनग्लियाना, लालचमालियाना, लालझिरिलियाना, लालरिनसंगा यांचा समावेश आहे. सहा राज्यमंत्र्यांत के.लालरिनलियाना, लालचंदमान राल्ते, लालरूट किमा, डॉ. के. बेइशुआ, टी.जे. लालनुनतलुआंगा, रॉबर्ट रोमाविया राल्ते यांचा समावेश आहे.
एनडीएतून बाहेर पडणार नाही : झोरमथंगा
सध्या तरी एनडीए किंवा एनइडीएमधून बाहेर पडण्याचा इरादा नाही, असे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी सांगितले.